वार्ताहर / पुसेगाव :
गेली दोन वर्ष पुसेगाव बाजारपेठमधून सातारा-लातूर या रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे व कंपनीच्या उदासीनतेमुळे हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, ग्रामस्थांना द्यावयाच्या सोयीसुविधांबाबतच्या नियमांचे पालन ठेकेदाराकडून होत नाही. त्यामुळे
रस्त्यालगतच्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना या कामाचा मोठा फटका बसत आहे. एक वेळ काम नाही झाले तरी चालेल पण सर्वसामान्य दुकानदार व व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये, हातावर पोट असलेला सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे, म्हणून मंगळवारी पुसेगाव बाजारपेठ बंद ठेऊन संबंधित कामाच्या ठेकेदाराचा निषेध करण्याचा निर्णय पुसेगावातील व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. शिवसेनेचे सातारा जिल्हाउपप्रमुख प्रताप जाधव यांनी याबाबत माहिती दिली.
ठेकेदाराच्या निषेधार्थ मंगळवारी सर्व व्यापारी बंधूंनी आपली दुकाने बंद ठेवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रताप जाधव यांनी केली आहे.