नवी दिल्ली
बिहारच्या मुजफ्फरपूर येथील निवारा केंद्रातील मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 19 जणांना दोषी ठरविले आहे. सर्व दोषींच्या शिक्षेची घोषणा 28 रोजी केली जाणार आहे. तर न्यायालयाने मोहम्मद साहिल उर्फ विक्की या आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलशेष्ठ यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर समवेत 19 जणांना 1045 पानी स्वतःच्या आदेशात दोषी ठरविले आहे. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
34 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण
मुजफ्फरपूरच्या निवाराकेंद्रात 34 हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे उघडकीस आले होते. वैद्यकीय चाचणीत सुमारे 34 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी मिळाली होती. गुंगीचे औषध दिल्यावर लैंगिक शोषण केले जात होते, असा खुलासा पीडित मुलींनी केला होता.
शासकीय अधिकाऱयांचा हात
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार मुजफ्फरपूर प्रकरणात निवारा केंद्रातील कर्मचाऱयांचा हात होता. सामाजिक कल्याण विभागाच्या अधिकाऱयांनी अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले हेते. आरोपींमध्ये 12 पुरुष तसेच 8 महिलांचा समावेश होता.
2018 मध्ये उघडकीस
मुजफ्फरपूरमधील हे प्रकरण टाटा इन्स्टीटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसकडून 26 मे 2018 रोजी बिहार सरकारला सोपविण्यात आलेल्या एका अहवालानंतर उघडकीस आले होते. अहवालात निवारा केंद्रातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे नमूद करण्यात आले होते.









