एक जखमी तर लाखो रूपयांचे नुकसान : काही गावांमध्ये घरावरील पत्रेही उडाले : अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

प्रतिनिधी /बेळगाव
सोसाटय़ाच्या वाऱयासह सोमवारी दुपारनंतर विजांचा कडकडाट सुरू होता. वीज पडून बेळगाव तालुक्मयातील दोन गावांमध्ये गवत गंज्यांना आग लागण्याचा प्रकार घडला. मुचंडी येथे वीज पडून एक किरकोळ जखमी झाला तर गवतगंजीला आग लागून मोठे नुकसान झाले.
मुचंडी येथील सिद्देश्वर नगर येथे दुपारी 4 च्या सुमारास वीज पडून आग लागण्याची घटना घडली. यामध्ये सुरेश कृष्णा वालीशेट्टी हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या हाताला ईजा झाली आहे. तर त्यांच्याच गवत गंजीला आग लागून अंदाजे 30 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन जवानांनी तात्काळ आग विझवत ती पसरू नये याची खबरदारी घेतली.
अगसगे येथे गवतगंजीला आग, घरावरील पत्रे उडाले

अगसगे येथे झालेल्या वळीव पावसामुळे वीज कोसळून गवतगंजीला आग लागली. यामुळे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले तर दुसरीकडे घरावरील सिमेंटचे पत्रे वाऱयामुळे उडाल्यामुळे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी दुपारी 3.30 वा.सोसाटय़ाच्या वाऱयासह गडगडाट होऊन वळीव पावसातून शिवाजी अप्पय्या बच्चेनट्टी यांच्या दोन गवतगंजीवर वीज कोसळल्यामुळे दोन्ही गवतगंज्या आगीत भस्मसात झाल्या आहेत. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब येईपर्यंत दोन्ही गवतगंज्या आगीत भस्म झाल्या होत्या. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्मयात आली नाही. जनावरांसाठी जमा केलेला चारा जळून गेल्यामुळे शेतकऱयाचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शिवारातील भैरू जयवंत कंग्राळकर यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे वाऱयामुळे उडून घराचे छप्परच नाहीसे झाले. यामुळे त्यांचे सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले आहे.









