अचानक वीज गेल्याने नागरिकांची तारांबळ, उद्योग करायचे कसे? असा सवाल
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील मुख्य वीज केंद्रापासून वडगाव येथील वीज केंद्रापर्यंतच्या 110 के. व्ही. वीजवाहिनीमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. यामुळे अर्ध्या तालुक्मयामध्ये दुपारपर्यंत वीजपुरवठा ठप्प होता. अचानक वीजपुरवठा काढण्यात आल्यामुळे याचा परिणाम ग्रामीण भागात जाणवला. यामुळे व्यवसाय-उद्योग दुपारपर्यंत ठप्प झाले होते. वारंवार असे तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास मुख्य वाहिनीत बिघाड झाला. अचानक वीज गेल्यामुळे नागरिकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. लघु उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे. वारंवार वीजपुरवठा ठप्प होत असल्यामुळे लघु उद्योगांनी व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. आधीच कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असताना आता खंडित वीजपुरवठय़ामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.
यामुळे वडगाव केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येणाऱया गावांचा पुरवठा ठप्प होता. धामणे, ब्रह्मलिंग हट्टी, मासगोंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, येळ्ळूर, सुळगा, यरमाळ, राजहंसगड या गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. बिघाड झालेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम केपीटीसीएल व हेस्कॉमचे कर्मचारी करीत होते. अखेर 12.30 वा. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
उचगाव भागातही वीजपुरवठा ठप्प
मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे याचा फटका वाघवडे व उचगाव विभागालाही बसला. वाघवडे येथील औद्योगिक वसाहतीला तसेच कर्ले, बाळगमट्टी, बामणवाडी, नावगे, कुट्टलवाडी, रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, जानेवाडी व मच्छे विभागात वीजपुरवठा ठप्प झाला होता. उचगाव विभागामध्ये उचगाव, मंडोळी, गणेशपूर, सावगाव या भागात सकाळी 9 ते दुपारी 12 या काळात वीजपुरवठा नव्हता.









