मारूतीनगरमधील ड्रेनेजवाहिनी खुली करण्यासाठी दोन दिवसांपासून मनपा अधिकाऱयांची धावपळ
प्रतिनिधी /बेळगाव
शहराची मुख्य डेनेजवाहिनी राष्ट्रीय महामार्गाशेजारी तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा ठप्प झाला आहे. परिणामी गांधीनगरसह विविध परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी साचू लागले आहे. या समस्येचे निवारण करण्याचे काम शनिवारी दुपारपासून सुरू आहे. पण डेनेजवाहिनी सापडत नसल्याने महापालिका प्रशासनाची शोधमोहीम रविवारी दुपारपर्यंत सुरू होती.
शहरात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा निचरा होणे मुश्कील बनले आहे. अशातच डेनेजवाहिनी तुंबल्याने नागरिकांच्या समस्येत भर पडली आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बळ्ळारी नाल्यापर्यंत डेनेजवाहिन्या घातल्या आहेत. शिवाजीनगर, महांतेशनगर, गांधीनगर अशा विविध भागातील सांडपाण्याचा निचरा करणारी मुख्य डेनेजवाहिनी राष्ट्रीय महामार्गाशेजारी मारुतीनगरजवळ तुंबली आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा थांबला आहे. शहरातील बहुतांश नागरिकांनी टेरेसचे आणि इतर पाणीही डेनेजवाहिनीला जोडले आहे. त्यामुळे सांडपाण्याबरोबरच पावसाचे पाणी डेनेजवाहिनीद्वारे वाहते. पण ही डेनेजवाहिनी तुंबल्याने अडचण निर्माण झाली आहे. काही नागरिकांच्या स्वच्छतांगृहामधून सांडपाणी ओव्हरफ्लो होत आहे. डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. याचा फटका विविध परिसरातील नागरिकांना बसल्याने मनपाकडे तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने पाहणी केली असता मुख्य जलवाहिनी तुंबली असल्याचे आढळून आले.
मुख्य वाहिनी तुंबल्याचे आढळून आल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी दुपारी डेनेजवाहिनी खुली करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण दुरुस्तीसाठी खोदाई केलेल्या ठिकाणी सांडपाणी साचू लागल्याने कामात अडथळा निर्माण झाला. शनिवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न करूनही समस्येचे निवारण झाले नाही. त्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशीदेखील मनपा अधिकाऱयांनी धाव घेऊन दुरुस्तीचा प्रयत्न केला. सकाळपासून समस्यांचे निवारण करण्याचे काम सुरू केले. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अन्य ठिकाणांच्या डेनेज चेंबरचा शोध घेतला. दुपारपर्यंत चेंबर सापडले नाही. दुपारनंतर चेंबर सापडल्यानंतर डेनेजवाहिनी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी मनपाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर, पर्यावरण साहाय्यक अभियंते अदिलखान पठाण व इतर अधिकारी उपस्थित होते. तुंबलेली जलवाहिनी खुली करण्यासाठी स्वच्छता कामगारांनी परिश्रम घेतले. अखेर सायंकाळी ड्रेनेजवाहिनी खुली केली.









