राजापूर तालुक्यातील ओझर शाळेतील प्रकार : कपातीचे पैसे परस्पर स्वत:सह लिपिकाच्या खात्यात : चार सहकारी शिक्षकांची 20 महिने फसवणूक
वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ओझर या प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी सहकारी शिक्षकांच्या पगारात सुमारे 81 हजार रूपयांचा अपहार केल्याची तक्रार राजापूर पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. शाळेतील चार शिक्षकांच्या पगारातून पतपेढी कपातीची रक्कम पतपेढीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या खात्यात जमा केल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे.
याबाबत ओझर माध्यमिक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शरद दत्ताराम देसाई यांनी राजापूर पोलिस स्थानकात तक्रार अर्ज दिला आहे. शाळेतील शिक्षकांची वेतनपत्रके मुख्याध्यापक सुनिल कोलते तयार करून पाठवितात. पगार पत्रकामध्ये विविध कपाती केल्या जातात. यापैकी पतपेढी कपातीमध्ये मुख्याध्यापकांनी अपहार केल्याचा आरोप तक्रार अर्जाद्वारे करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांनी पतपेढीने कळविलेल्या रकमेनुसार कपात न करता पगारातून जादा रक्कम कापून घेतली. ही जास्तीची कापलेली रक्कम मुख्याध्यापकांनी परस्पर स्वतःच्या खात्यात तर काही वेळा शाळेचे लिपिक वसंत कोकरे यांच्या खात्यावर जमा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अशा पध्दतीने पतपेढी कपातीतून मार्च 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत मुख्याध्यापकांनी शदर देसाई यांच्या वेतनातील 44 हजार, सहकारी शिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या वेतनातील 35 हजार तर मुरलीधर खानविलकर व बजरंग सातपुते यांच्या वेतनातील प्रत्येकी एक हजार अशा सुमारे 81 हजार रूपयांचा अपहार केला आहे. ही कपात जाणीवपूर्वक संबंधित शिक्षकांना कोणतीही कल्पना न देता पैसे लाटण्याच्या उद्देशाने केल्याचे देसाई यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. पतपेढी कपातीप्रमाणे विमा पॉलीसीच्या हप्त्यासाठीही पगारातून कपात केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र विमा कंपनीला पैसेच भरले जात नसल्याने पॉलीसी बंद पडल्या आहेत. अशा पध्दतीने मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या भविष्यातील गुंतवणुकांच्या रक्कमेवरही डल्ला मारल्याचे अर्जात नमूद आहे.
इनकमटॅक्सच्या बाबतीतही मुख्याध्यापकांनी असाच घोटाळा केला आहे. पगार पत्रकातून दर महिन्याला इनकम टॅक्ससाठी कपात केली जाते. वर्षाच्या अखेरीस टॅक्स काढून आणल्यावर कपात केलेला रक्कमेपेक्षा जादा रक्कम भरावी लागत असल्याने मुख्याध्यापक जादा रक्कम कळवून शिक्षकांकडून कोरे चेक घेतात व त्यावर स्वतः रक्कम घालतात. मात्र सी.ए. यांनी सांगितलेली रक्कम आणि मुख्याध्यापकांनी काढलेली रक्कम यात फरक असल्याचे निदर्शनास येत आहे. मुख्याध्यापकांनी शीकांकडून कोरे चेक घेऊन त्याद्वारे आवश्यकतेपेक्षा 1 हजार रूपये जादा काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मागील सुमारे 20 महिने मुख्याध्यापक विविध प्रकारचा अपहार करत असून त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.