मुंबई/प्रतिनिधी
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रामुळे शिवसेनेत खळबळ उडाली होती. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजप बरोबर जुळवून घ्यावे असे म्हंटले होते. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला असून लवकरच बातमी कळेल, असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, संजय राऊत यांना माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला निघाला आहेत का? असा प्रश्न करताच राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नाही पक्ष प्रमुखांना भेटायला निघालोय असे विधान केले होते.
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी भेट घेतली. दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भाजपची जुळवून घ्या, असं पत्र लिहिणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.
‘प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली, त्यांनी त्यांची भावना या पत्रात व्यक्त केली. सरनाईक हे आजन्म ते शिवसेनेतच राहतील असं ते म्हणाले. मी हे साहेबांनाही सांगितलंय. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात लवकरच तुम्हाला एक बातमी मिळेल’ असं राऊत म्हणाले.