प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर बधितांसह स्थलांतरीत कुटुंबांना मदतीसाठी शासनाने काही निकष शिथिल करावेत. तसेच पुरपट्ट्यातील व्यापारी, उद्योजक, यंत्रमाग धारक आणि सर्वच छोट्या – मोठ्या व्यावसायिकांना पुन्हा उभारी मिळण्यासाठी ‘खास पॅकेज’ दिले जावे अशी मागणी, खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोमवारी सांगली जिह्याच्या दौऱयावर असताना खासदार माने यांनी त्यांना पूरग्रस्त भागातील समस्या सांगितल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले.
मदतीसाठी लवकरच बैठक
महापुराने शेतकरी, व्यापारी, विविध व्यावसायिक, यंत्रमाग धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना वाऱयावर सोडणार नाही. पाहणी दौरा झाल्यानंतर मुंबईत मदतीसाठी बैठक घेऊन दिलासा देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. पूरग्रस्त भागातील शेती, घरे, उद्योगांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई देण्यात यावी. पुर्णतः आणि अंशतः असा भेदभाव न करता पडझड झालेल्या सर्वच घटकांना पुर्णतः असा निकष लावून भरपाई दिली जावी. पुरामुळे बाधित भागातील रस्ते खराब झाले आहेत. याकरिता खास निधी उपलब्ध व्हावा. पूर बाधित गावातील लोकांना किमान सहा महिन्याचे रेशन मोफत दिले जावे. छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिकांना नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई दिली जावी.
अतिवृष्टीमुळे डोंगरी भागात भूसंलेखन होऊन शेत जमिनीवर मातीचे ढिगारे पडले आहेत. अशा शेतकऱयांनाही विशेष पॅकेज जाहीर करावे. मृत पशु धारकांना नुकसान भरपाई मिळावी. पॉलीहाउस, ग्रीन हाऊसचेही मोठे नुकसान झालेले आहे. 2019 च्या महापुरात त्यांना मदत मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी त्यांना वंचित ठेवले जाऊ नये. ऊस पिकाचे आणि त्यातील ठिबक सिंचनचेही नुकसान झाले असून पंचनामे करून तातडीने मदत दिली जावी. नदीवरील पुलांच्या गाळ्यांची संख्या वाढविण्याबरोबरच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
कोरोनामुळे ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी द्यावा. पूर बाधित गावातील नागरिकांचे तातडीने लसीकरण व्हावे. खासगी व शासकीय पशुवैद्यकीय पदवीधारक यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, नितीन बानगुडे-पाटील, सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, सांगलीचे आनंदराव पवार, हुतात्मा दूध संघ चेअरमन गौरवभाऊ नायववडी, विभुते, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.








