प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील २०२१ च्या महापुराने तेथील पूरग्रस्तांना मदती संदर्भात करावयाच्या उपाय योजना संदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्याशी झालेल्या आढावा बैठकी मध्ये सविस्तर मागण्या तात्काळ मंजूर करून पूरग्रस्त भागातील नागरिक व व्यापारांना दिलासा मिळेल यासाठी लवकरात लवकर खालील मागणी मंजूर व्हाव्यात अशी विनंती केली.
महापुरामुळे पूरग्रस्त भागातील जनतेचे घरांचे तसेच त्यांच्या संसारोपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे पूर बाधित घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यांचा संसार पुन्हा उभारण्यासाठी तसेच घराची साफसफाई स्वच्छता करण्यासाठी तातडीने पंचनामे करतानाच रोखीने दहा हजार रुपये मदत देण्यात यावी. पंचनाम्यासाठी 2019 च्या निकषानुसार पूरग्रस्तांनी मोबाईलने काढलेले छायाचित्र हाच पुरावा म्हणून ग्राह्य धरावा. सांगलीची दोनशे वर्षांपूर्वीची जुनी मुख्य बाजारपेठ गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहे.
महापूर त्यानंतर सलग कोरोना आणि पाठोपाठ पुन्हा महापूर अशा आपत्तीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापाराबरोबरच त्यांचा कामगार, कर्मचारी वर्ग ही आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना तातडीने आर्थिक सवलती, विज बिल माफी, कर्ज हप्त्यात सवलती, व्याजमाफी जाहीर कराव्यात. शेतीचे तसेच व्यापारी आस्थापना यांचे पंचनामे करताना किचकट आणि कडक निकष लावण्यात येऊ नयेत. तसेच व्यापारी आणि घरांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. पिकांच्या नुकसानीचे पैसे तातडीने शेतकर्यांनच्या खात्यात जमा करण्यात यावेत.
सांगलीत गेली दोन वर्षे सतत आपत्ती सुरू असल्याने बारा बलुतेदार प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. या वर्गातली हजारो व्यापारी, मजूर बांधवांना मोठ्या मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी वेगळा मदतीचा निकष लावून जास्तीत जास्त मदत करावी. किरकोळ व्यापारी, टपरीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले यांचे हातावरचे पोट असते. त्यांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी त्यांना सवलती देऊन मदत जाहीर करावी. पडझड झालेल्या घरांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी. तोवर त्यांना घरभाडे देण्यात यावे. पूरग्रस्त भागातील शेतकर्यां ची, व्यापाऱ्यांची वीजबिले माफ करावीत. पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरूस्तीसाठी, बांधकामासाठी वाळू, मुरूम मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.
सांगलीला गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा महापुराचा फटका बसला आहे. महापुराने होणारे नुकसान टाळण्यासाठी पुराचे पाणी वळवून दुष्काळी भागाला द्यावे. कृष्णा-भिमा स्थिरीकरण योजनेसह विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज आढावा बैठकी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मागणी केली यावेळी कृषी राज्यमंत्री . विश्वजीत कदम आमदार सुरेश खाडे उपस्थित होते.