व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधला संवाद : आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी अधिकाऱयांनी 24 तास सतर्कतेने काम करावे. मदतकार्यांना निधीची कमतरता नाही. कोणत्याही प्रकारची मदत त्वरित दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना दिली.
शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बेळगावचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह जिल्हय़ातील अधिकाऱयांशी संवाद साधला. पावसामुळे बंद पडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, नादुरुस्त रस्ते दुरुस्त करावेत, कोणत्याही प्रकारची प्राणहानी होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिली.
यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगाव जिल्हय़ातील सद्यस्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. 47 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. 51 गावे जलमय झाली आहेत. 224 घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे 36 पूल पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासांत 6 मि. मी. पाऊस व्हायला हवा होता. मात्र, प्रत्यक्षात 66 मि. मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. निवारा केंदे सुरू करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये मंजूर करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. बेळगाव व बागलकोट जिल्हय़ासाठी एनडीआरएफचे आणखी एक पथक नियुक्त करावे, अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला 1 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. चिकोडी तालुक्मयातील कल्लोळ बंधाऱयाच्या बांधकामासाठी 35 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.
यावेळी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, मनपा आयुक्त जगदीश के. एच. आदी अधिकारी उपस्थित होते.
पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्मयता आहे. आलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढता आहे. त्यामुळे संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन 3 लाख क्मयुसेक्स विसर्ग वाढविण्यात आल्याचे अधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. जर पाऊस कमी झाला तर कसल्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केल्याचे सांगितले.









