मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतर घेणार आढावा बैठक
बेंगळूर/प्रतिनिधी
केरळमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील तीन जिल्हे या सीमेला लागून आहेत. यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे. दरम्यान, याविषयी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यासाठी आणि कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मी दिल्लीहून परत आल्यावर मी सविस्तर बैठक घेईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री बोम्माई दोन दिवसांच्या राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ४४ हजार २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक करोना रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
केरळमधील परिस्थिती चिंताजनक असून २४ तासात २२ हजार ६४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ७२४२ रुग्णांची नोंद झाली. यानंतर आंध्रपदेश (२१०७), कर्नाटक (२०५२) आणि तामिळनाडूचा (१८५९) क्रमांक आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांची या पाच राज्यांमधून झाली असून एकट्या केरळमधून ५० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे.