मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला भाजपने ठिकठिकाणी आंदोलनं केली. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकारलं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा, असा प्रवीण दरेकर यांनी सल्ला दिला आहे. रविवारी मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रविण दरेकर सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.
प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपने काल संपूर्ण राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष उभा केला,आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला आदळआपट म्हणणं म्हणजे आंदोलकांची किंबहुना ज्या समाजाच्या न्याय हक्कांसाठी भाजपकडून संघर्ष करण्यात आला. त्यांचा अपमान करण्यासारखी किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे. ओबीसी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे ‘आदळआपट’ असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही?, असा सवालही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आहे. संघर्षातून न्याय मिळविणे हा शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. मात्र आज संघर्ष नको असे शिवसेना सांगत आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याकारणामुळे आज केवळ सत्ता टिकवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली.
Previous Articleमिरजेत २०० जणांच्या अँटीजन चाचणीत दोघे कोरोनाबाधित
Next Article पर्यटकांना कासला जाण्यास मज्जाव








