नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; मात्र 25 हून अधिक आमदार अनुपस्थित
प्रतिनिधी / बेंगळूर
सत्ताधारी भाजप पक्षात मंत्रिमंडळ विस्तार व खातेबदलावरून निर्माण झालेली नाराजी अद्याप कमी झालेली नाही. पक्षातील काही मंत्री आणि आमदारांमध्ये असणारी नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंगळवारी रात्री आपल्या ‘कावेरी’ या अधिकृत निवासस्थानी भोजनावळीचे आयोजन केले होते. मात्र, या भोजनावळीला 25 हून अधिक आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
खातेबदल आणि खातेवाटपामुळे अनेक मंत्री आणि आमदार यांच्यात काही दिवसांपासून असंतोष खदखदत आहे. या आमदारांना विश्वासात घेण्याच्या निमित्ताने येडियुराप्पा यांनी भोजनावळीचे आयोजन केले होते. परंतु खातेबदलानंतर नाराज झालेले मंत्री आनंदसिंग आणि जे. सी. माधुस्वामी भोजनावळीपासून दूर राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे.
याच दरम्यान केवळ भोजनावळ असल्याने काही आमदार दूर राहिले. तर काही जण मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा धनी बनू नये यासाठी दूर राहिले. काहींनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेत अनुपस्थिती दर्शविली. उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण वाढदिवस कार्यक्रमात व्यग्र असल्याने भोजनावळीला उपस्थित राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पक्षांतर करून आलेले 7 ते 8 जण मुख्यमंत्र्यांच्या भोजनावळीला आले परंतु, भोजन न करताच मंत्री बी. सी. पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले.
अनुपस्थित आमदार
आमदार सुनीलकुमार बसवनगौडा पाटील-यत्नाळ, जी. एच. तिप्पारेड्डी, अरविंद बेल्लद, एच. नागेश, डी. एस. सुरेश, एस. ए. रामदास, कळकप्पा बंडी, वीरण्णा चरंतीमठ, अरुणकुमार, सी. एम. उदासी, सोमशेखर रेड्डी, करुणाकर रेड्डी, उळीहट्टी शेखर, सतीश रेड्डी, पूर्णिमा श्रीनिवास, महांतेश पाटील आदी आमदार भोजनावळीला उपस्थित झाले नव्हते.