प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधानियुक्त कंट्रोल आणि कमांड सेंटरचे उद्घाटन दि. 29 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र मुख्यमंत्री बेळगावात येणार असल्याने आणखीन काही प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. याकरिता अशोकनगर येथील क्रीडा संकुलाची रंगरंगोटी करण्याचे काम य्द्धुपातळीवर सुरू आहे.
शहरात घडणाऱया घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी शहरात कंट्रोल ऍन्ड कमांड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या दौऱयावेळी शहरात राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता जिल्हा प्रशासन, महापालिका आणि स्मार्टसिटी कंपनीने तयारी चालविली आहे. सरदार मैदानात स्टेडिअम उभारण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा यापूर्वी झाला आहे. मात्र याचे उद्घाटन करण्यासाठी सरदार मैदानाभोवती असलेल्या संरक्षक भिंतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र थेडे काम झाल्यानंतर काम बंद करण्यात आले.
अशोकनगर परिसरात मुख्यमंत्री विकास अनुदानामधून क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे क्रीडा संकुलात अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आटापिटा चालविला आहे. तसेच क्रीडा संकुलातील भिंती रंगविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी भिंतीवर विविध चित्रे रंगविण्याचे काम सुरू आहे. तसेच स्मार्टसिटी योजनेअंतर्गत पूर्णत्वास आलेल्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यासाठी सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे..









