प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली असून पाटील गल्लीतील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱयानिमित्त केवळ उषाताई गोगटे शाळेसमोरील आणि पिंपळकट्टा चौकातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठीदेखील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या दौऱयानिमित्त शहरातील रस्ते स्वच्छ करून चकाचक करण्यात आले आहेत. तसेच काही रस्त्यांवरील खड्डे दगडमातीने बुजविण्यात आले आहेत. एरव्ही शहरातील अस्वच्छतेबाबत, कचऱयाची उचल करण्यासाठी आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनी केली असता मनपाचे अधिकारी फिरकूनही पाहत नाहीत. पण मंत्रीमहोदयांच्या दौऱयावेळी रस्त्याशेजारील कचरा शोधून स्वच्छ केला जातो.
सर्किट हाऊस ते फोर्ट रोडपर्यंतच्या कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट रोडशेजारी कचरा टाकण्यात येत असल्याने संपूर्ण रस्त्याशेजारी अस्वच्छता पसरलेली असते. सदर परिसर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत येत असल्याने वेळेवर स्वच्छता केली जात नाही. तसेच कचऱयाची उचल करण्याकडे कानाडोळा केला जातो. हा परिसर कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने महापालिकेकडून कचऱयाची उचल केली जात नाही. त्यामुळे दोन्ही स्वराज्य संस्थांच्या वादात अस्वच्छता पसरलेली असते. मात्र मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा शुक्रवारी बेळगाव दौऱयावर आले होते. त्यावेळी गुडस्शेड रोड येथील आरएसएसच्या कार्यालयाला भेट देणार होते.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सर्किट हाऊस ते फोर्ट रोडपर्यंतच्या रस्त्याशेजारील कचऱयाची उचल करून महापालिकेने स्वच्छता मोहीम राबविली. तसेच फोर्ट रोड, पाटील गल्लीतील शनिमंदिरपर्यंतचा रस्ता, गुडस्शेड रोड स्वच्छ करून चकाचक करण्यात आला
होता.
उषाताई गोगटे शाळेसमोरील मोठय़ा खड्डय़ासह इतर खड्डे माती व दगड घालून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य रस्त्यांवरील खड्डे पावसाळय़ापूर्वी बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.









