मुंबई/प्रतिनिधी
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने शुक्रवारी औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित होते. शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविषयी संजय राऊतांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपाकडून देखील मुख्यमंत्र्यांच्या हाकेला ओ देत असल्याच्या प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या त्या विधानामागचा नेमका अर्थ कोणता? याविषयी भाष्य केलं आहे. तसेच, “ज्यांना पतंग उडवायचीये, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची, हे आम्हाला समजतं”, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी “मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची एक वेगळी शैली आहे. त्या स्टाईलने त्यांनी हे भाषण केलं आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला माजी म्हणून नका, त्या याचबाबतच्या हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचंय. त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या”, असं संजय राऊत म्हणाले.








