ऑक्टोबरपर्यंत सर्व मतदारसंघ पूर्ण करणार : प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
चतुर्थीपूर्वी अनेक मतदारसंघात दौरे व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आता पुन्हा एकदा आपले दौरे प्रारंभ करणार आहेत.
चतुर्थीनिमित्त काही काळ या दौऱयांमध्ये खंड पडला होता. आतापर्यंत 18 मतदारसंघातील दौरे पूर्ण झाले आहेत. आता दि. 21 पासून उर्वरित मतदारसंघांचे दौरे सुरू होणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत सर्व मतदारसंघ पूर्ण करण्यात येणार येतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. 20 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. नियुक्तीनंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट असून आपल्या दौऱयात ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने केलेल्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, आमदार, पक्ष पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष यांनी आतापर्यंत केलेल्या 18 मतदारसंघ दौऱयात लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, अडचणी, मागण्या जाणून घेतल्या आहेत. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी अनेक प्रकल्पांची घोषणा, पायाभरणी आणि उद्घाटनेही केली आहेत. त्याचबरोबर बुथवरील प्रमुख कार्यकर्ते आणि इतरांच्या गाठीभेटी घेऊन संघटनात्मकदृष्टय़ा चर्चा केली आहे.









