ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक (पीए) आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे नेमक्मया कोणत्या मागण्या केल्या याबाबत अजून काही माहीती मिळालेली नाही. मात्र, या अज्ञात व्यक्तीने केलेल्या मागण्या नार्वेकर यांनी पूर्ण न केल्यास मिलिंद नार्वेकर यांच्यामागे चौकशी लावण्याची धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे याचा तपास सोपवण्यात आला असून चौकशी सुरु आहे. याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱयानं सांगितले की, मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सऍप मेसेज पाठवला. यात आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे.
नार्वेकर शिवसेनेचे सचिव असून ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत. ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणाऱयांपैकी त्यांचे नाव आघाडीवर आहे.









