प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांचे बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांत्वन केले. ते आज आपल्यात नाहीत, हेच आपल्याला सहन होत नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
सुरेश अंगडी यांच्या आई सोमव्वा, पत्नी, मुलींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत उद्योगमंत्री जगदीश शेट्टर, गृहमंत्री बसवराज बोम्मई, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना पाहताच आईच्या दु:खाचा बांध फुटला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले.
सुरेश अंगडी हे अजातशत्रू होते. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून अल्पावधीत त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांइतकाच आपल्यालाही धक्का बसला आहे. नवी दिल्ली येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाचा फैलाव व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना केली आहे. सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन मास्क परिधान न करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.









