लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरीब, श्रमिक वर्गांना मदत शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी दबाव आणल्याने लॉकडाऊनचा फटका बसलेल्या श्रमिक आणि गरिबांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. बुधवारी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषद बोलावली असून यावेळी विशेष पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे
लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यास गरिबांना आणि श्रमिक वर्गाला विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंगळवारी अर्थखात्यातील अधिकाऱयांची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी पॅकेज कोणत्या स्वरुपात असावे, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी येडियुराप्पा कोरोना नियंत्रणासाठी जबाबदारी दिलेल्या विविध मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची घोषणाही होणार का?, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यामुळे येडियुराप्पा बुधवारी शेतकरी, भाजी-फळ विक्रेते, ऑटो रिक्षाचालक, केशकर्तनकार, परीट, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणारे, हॉटेल कामगार, बांधकाम कामगार, फुलशेती करणारे शेतकरी तसेच लॉकडाऊनमुळे संकटग्रस्त झालेल्यांसाठी विशेष पॅकेजद्वारे मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. ही मदत आर्थिक स्वरुपात असेल की अन्य स्वरुपात याविषयी स्पष्टपणे समजलेले नाही. मागील वर्षी देखील सरकारने लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्यांना मदतीचे विशेष पॅकेज घोषित केले होते.
घरभाडे भरण्यासाठी घरमालकाने भाडेकरुंवर दबाव आणू नये, बीपीएल रेशनकार्डधारकांना ग्रॉसरी किट, पाणी बील, वीजबिल भरण्यासाठी एक महिन्याची वाढीव मुदत, राज्यातील 2.30 केशकर्तनकारांना 2.30 लाखांची मदत, ऑटो रिक्षाचालक, कॅबचालकांना आर्थिक मदत, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणारे, भाजी-फळ विक्रेत्यांना आर्थिक मदत, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5 हजारांची मदत, आशा कार्यकर्त्यांना साहाय्यधन, फूलशेती करणाऱयांना हेक्टरी 25 हजारांची मदत, हॉटेल कामगारांना आर्थिक पॅकेज घोषित होण्याची शक्यता आहे
लॉकडाऊन वाढीची घोषणा शुक्रवारी?
राज्यात 24 मे पर्यंत लॉकडाऊन जारी आहे. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा सल्ला मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढीबाबत बुधवारी घोषणा होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.









