सातही सरपंचांकडून पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण ः काँग्रेस नेत्यांनी वस्तुस्थिती पडताळून नंतरच बोलावे
प्रतिनिधी / सांखळी
राज्यातील इतर पालिकांच्या तुलनेत सर्वांत छोटय़ा असलेल्या सांखळी पालिकेत घडलेले राजकीय नाटय़ संपूर्ण गोव्यात चर्चेचा विषय बनला आहे. येथील नाटय़मय घडामोडीत काँग्रेसच्या हातातून सर्वकाही निसटून जात असतानाच सांखळी नगर पालिकेत काँग्रेसला आशेचा एक किरण दाखवला. या घडामोडींवरून काँग्रेसचे मोठमोठे नेते तोंडसुख घेत आहेत. यावर सांखळी मतदारसंघातील सातही सरपंचांनी पत्रकार परिषदेत आपली आपली भूमिका मांडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी आधी वस्तुस्थिती पडताळून नंतरच बोलावे.
ज्या गिरीश चोडणकर यांना स्वतःच्या पक्ष कार्यकर्त्यांना सांभाळता येत नाही, त्यांनी सांखळी मतदारसंघातील राजकारणावर अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये, असे भाजप मंडळ सदस्य कालिदास गावस पत्रकार परिषदेत म्हणाले.
सांखळी मतदारसंघात भाजप भक्कम आहे. मतदारसंघातील सातही पंचायती भाजपकडे असून कार्यकर्त्यांची मोठी फौज आमच्याकडे आहे. तेव्हा भाजपला रोखण्याचा विचार काँग्रेसने डोक्मयातून काढून टाकावा. भाजप समर्थक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आरोप करण्याचा नाद सोडून द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुर्ला सरपंच चंद्रकांत घाडी, वेळगे सरपंच महेश गवंडे, पाळी सरपंच
प्रशिला गावडे, कुडणे सरपंच महेंद्र एकावडे, न्हावेली सरपंच, हरवळे सरपंच गुरुप्रसाद नाईक, आमोणा सरपंच आलिया गावस, माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक शुभदा सावईकर, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, रेश्मी देसाई, ब्रह्मा देसाई, कालिदास गावस यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांवरील आरोप खपवून घेणार नाही!
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सांखळी पालिका राजकारणात कोणताही हस्तक्षेप नसताना काँग्रेसचे गिरीश चोडणकर, धर्मेश सगलानी व इतरांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे व वैफल्यग्रस्त मानसिकतेचे प्रतीक आहे. डॉ. सावंत यांची लोकप्रियता वाढत असल्याने काँग्रेसला आपला पराभव दिसत आहे, त्यातूनच बेताल आरोप केले जात असून या पुढे अकारण मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा सांखळी मतदारसंघातील सातही पंचायतीचे सरपंच तसेच भाजप मंडळ नेते व भाजप नगरसेवक व विर्डीतील ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
प्रभाग 13 चे नगरसेवक राजेश सावळ यांना भाजपने निवडून आणले. त्यांनी उमेदवारीसाठी व पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्याकडे आम्ही आणले मात्र निवडून येताच त्यांनी रंग बदलला. धर्मेश सगलानी यांनी त्यांना बेकायदा इमारत बांधकाम पाडण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मिलिंद नाईक व इतरांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजेश सावळ यांच्यात खरी धमक असेल तर त्यांनी पुन्हा विर्डीतून निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान यावेळी देण्यात आले. सावळ यांच्यावर बेकायदा बांधकाम व इतर बाबतीत तक्रारी केल्या आहेत. त्याचा डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी कसलाच संबंध नाही. त्यामुळे सावळ व काँग्रेस नेत्यांनी खोटे आरोप करण्याचे थांबवावे ते खपवून घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.
मुख्यमंत्री नेहमीच सर्व घटकांसाठी कार्यरत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गरिबीतून व परिश्रम करून वर आलेले नेते असून त्यांनी सुडाचे राजकारण कधीच केले नाही. शेवटच्या घटकापर्यंत सर्व ती मदत पोहचवणे हा त्यांचा ध्यास आहे. अशा नेत्यावर खोटे आरोप करून काँग्रेस नेत्यांनी आपली योग्यता दाखवून दिली आहे, अशी टीका यशवंत माडकर, कालिदास गावस यांनी केली.
सर्व जनता डॉ.सावंतांच्या पाठीशी!
डॉ. प्रमोद सावंत हे सांखळी मतदारसंघातून पुन्हा मतांची मोठी आघाडी घेऊन विजयी होणार आहेत. सारी जनता त्यांच्या पाठीशी आहे. चुकीचे आरोप करून काँग्रेसला मते मिळणार नाहीत, हे या नेत्यांनी ध्यानात ठेवावे, असे गुरुप्रसाद नाईक, सालीया गावस, महेंद्र एकावडे, चंद्रकांत घाडी, नम्रता गावस, महेश गवंडे, प्रशिला गावडे यासाठी सरपंच तसेच कालिदास गावस व इतरांनी केली.
चावी पालिकेतच असते : माडकर
केबिनची चावी दिली नाही, असा आरोप धर्मेश सगलानी यांनी केला. तो धादांत खोटा आहे. पालिका ही सरकारी असून त्या केबिनच्या चाव्या आम्ही ठेवू शकत नाही, हे सात वर्षे नगराध्यक्ष असलेल्या सगलानी यांना माहिती नाही, हे हास्यास्पद आहे. उपनगराध्यक्ष यांच्यावरही अविश्वास दाखल झाल्याने सोपस्कारसाठी विलंब झाला असेल, मात्र खोटे आरोप सहन करणार नाही, असे यशवंत माडकर यांनी सांगितले.









