महिला पोलिसाच्या पतीला कोरोनाची बाधा झाल्याने खबरदारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्र्यांचे बेंगळूरमधील गृहकार्यालय ‘कृष्णा’मध्येही कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. कृष्णा या गृहकार्यालयातील महिला पोलिसाच्या पतीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून कार्यालय एक दिवसासाठी ‘सीलडाऊन’ करण्यात आले. तसेच संपूर्ण कार्यालय सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी दिवसभर विधानसौधमधूनच कामकाज सांभाळले.
दोन दिवसांपूर्वीच विकाससौधमधील महिला कर्मचाऱयाला कोरोना झाल्याचे आढळून आल्यानंतर विधानसौध कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱयांना शुक्रवारी ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना देऊन विकाससौधमध्ये सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. आता मुख्यमंत्र्यांच्या गृहकार्यालयातील महिला पोलीस कर्मचाऱयाच्या पतीचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गृहकार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱयांनी संपूर्ण कार्यालय सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण केले आहे.
आरोग्यमंत्र्यांचा सरकारी बंगलाही सील
मुख्यमंत्र्यांच्या गृहकार्यालयात अलिकडेच पार पडलेल्या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री बी. श्रीरामुलू देखील सहभागी झाले होते. या बैठकीत सहभागी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱयाच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समजताच खबरदारी म्हणून श्रीरामुलू यांचे बेंगळूरमधील सरकारी निवासस्थानदेखील सीलडाऊन करण्यात आले आहे.









