बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बेंगळूरमध्ये गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं. “२५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. तसेच भाजप उच्च कमांडच्या निर्णयाचे मी पालन करीन. कर्नाटकमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी काम करेन. ” असे ते म्हणाले.
दरम्यान, २६ जुलै रोजी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री भाग घेणार होते आणि २५ जुलै रोजी आमदारांसोबत दुपारच्या जेवणाचे आयोजन केले होते, मात्र आता कार्यक्रमांचे वेळापत्रक नव्याने ठरविण्यात आले आहे.
येडियुरप्पा यांचं ट्वीट
बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी रात्री ट्वीट करुन केंद्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा होती. “भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. पक्षाच्या आदेशाचं पालन करत सेवा करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पक्षशिस्तीचं पालन करावं. आंदोलन किंवा बेशिस्तीचं दर्शन घडवून पक्षाला लज्जास्पद ठरणारं वर्तन करु नये” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.