बेंगळूर/प्रतिनिधी
कावेरी नदीवरील मेकेदातू प्रकल्पावरून तामिळनाडू आणि कर्नाटकात वाद सुरु आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या अप्पर कृष्णा स्टेज -३ प्रकल्पाच्या प्रकरणावर बोलताना बोम्माई म्हणाले की, कर्नाटकला वाटप केलेल्या पाण्याच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी मागितली होती. दरम्यान, तेलंगणा सरकारने आपली रिट याचिका मागे घेतली असल्याने कर्नाटकला आपला वाटा वापरण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे ते म्हणाले.
कावेरी नदीवरील मेकेदातू प्रकल्पावर ते म्हणाले की त्यांनी बेंगळूरची मागणी पूर्ण करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाला लवकर मंजुरी मागितली आहे. “सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्रीय जल आयोगाला (CWC) सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की DPR कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पुढील अजेंडामध्ये घेण्यात येईल,” असे बोम्माई म्हणाले .दरम्यान, बोम्माई यांनी तामिळनाडूने कावेरीवर आंतरराज्य नदी जोडणी प्रकल्प हाती घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि ते कायदेशीररित्या स्वीकार्य नसल्याचे सांगितले.
गजेंद्रसिंह शेखावत यांनी कर्नाटक सरकारला या प्रकरणाबाबत लेखी सादर करण्यास सांगितले आहे आणि ती लवकरच केली जाईल, असे ते म्हणाले. “मी केंद्राला विनंती केली आहे की, कायद्यानुसार नदीच्या पाण्याच्या वादाच्या मुद्द्यांवर कर्नाटकच्या पाठीशी उभे राहावे. मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकर सुटेल.”
कावेरी आणि कृष्णा नदीच्या पाणी आंतरराज्य विवादांशी संबंधित प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांवर बेंगळूरमध्ये कायदेशीर अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी बैठक घेणार असल्याचेही बोम्माई म्हणाले.