बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्या मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना सकारात्मकता दराबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री बसवराजा बोम्माईंनी दक्षिण कन्नडच्या जिल्हा प्रशासनाला कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश वाढविण्याबरोबरच गंभीर उपाययोजना लागू करण्यासाठी १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या प्रदेशांतील ७० टक्के कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले पाहिजे. त्यांनी नमूद केले की जिल्ह्यात कोरोना सकारात्मकता दर चिंताजनक आहे. मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यात जिल्हा प्रशासनाच्या अपयशाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी म्हंटले.
“कोविड केअर सेंटर हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, स्वच्छ प्रयोगशाळा आणि आवश्यक कर्मचारी यासारख्या आवश्यक सुविधांनी सुसज्ज असले पाहिजेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा मागोवा घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. थर्मल तपासणी नियमितपणे केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बैठकीला आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर उपस्थित होते.