दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप गोव्यात मुख्यमंत्री बदलत असले तरी असे कितीही मुख्यमंत्री बदलले म्हणून लोकांचे मन बदलणार नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत गोमंतकीय भाजपला उखडून टाकून आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आणेल, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.
गोव्यातील विद्यमान राजकीय स्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री बदलाच्या या घटनेतून विद्यमान सरकार निक्रिय असल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले आहे, असे सिसोदिया म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे भाजप हायकमांडच्या लक्षात आल्यानेच हा निर्णय त्याना घ्यावा लागत असल्याचेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.
सावंत सरकारच्या अपयशाची असंख्य कारणे असल्यामुळे भाजपने मुख्यमंत्री बदलले तरी गोमंतकियांचे मन ते बदलू शकणार नाही. त्यामुळे भाजपचे समूळ उच्चाटन करून आपला सरकार स्थापनेची संधी गोमंतकीय देतील, असा विश्वास सिसोदीया यांनी व्यक्त केला आहे.
भाजप नेत्यांच्या अरेरावीने गोमंतकीय त्रस्त झाले असून लोकहिताची पर्वा न करता घेतल्या जाणाऱया निर्णयांचे पडसाद येत्या निवडणुकीत दिसून येणार आहेत, असे सिसोदीया यांनी म्हटले आहे.
विद्यमान सरकार कोविड संकटाचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले आहे, या निक्रियतेमुळेच राज्यातील पंचायतींना लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यादरम्यानही जनतेला मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री गोंधळ घालत राहिले, परिणामी अमित शहा यांना मध्यस्थी करावी लागली होती. कोविड वॉरियर्सच्या पगारात 20 टक्के वाढ करण्याचे आश्वासन दिले होते पण तोही जुमलाच ठरला.
हे सर्व कमी म्हणून की काय विद्यमान सरकार असंख्य घोटाळय़ांमध्ये गुंतलेले आहे. लेबर गेटच्या उघड झालेल्या महाघोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी बांधकाम मंडळाकडून कामगारांना दिले जाणारे पैसे स्वतःच्या कार्यकर्त्यांना वाटल्याचे स्पष्ट झाले होते.
सावंत सरकारने 10 हजार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती, परंतु आजपर्यंत प्रत्यक्षात कुणालाच रोजगार मिळालेला नाही. आम आदमी पक्षाने त्याविरोधात प्रचार केला, तेव्हा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर, हे सरकार ढोंगी जाहिराती करत आहे. परिणामी आज गोव्यात देशातील सर्वाधिक बेरोजगारी आहे.
खाण माफियांसमोर सरकार नतमस्तक
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून हे सरकार खाण लॉबीला खूश करत आहे यावरून खाण माफियांसमोर मुख्यमंत्री नतमस्तक झाल्याचे सिद्ध होत आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थितीही अत्यंत वाईट असून रोज हत्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. त्याशिवाय शिक्षण व्यवस्थेचा दर्जा गेल्या अनेक वर्षांपासून खालावला आहे. काही सरकारी शाळा बंद झाल्या आहेत, तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
अपयशाची ही जंत्री पाहूनच भाजपने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कितीही मुख्यमंत्री बदलले तरी जनतेचा मूड बदलणार नाही, असेही ते म्हणाले.
सिसोदिया यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा- तानावडे
राज्याचे नेतृत्व बदलाची चर्चा केवळ अफवा आहे. आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गोव्यातील नेतृत्व बदलाविषयी केलेले विधान लोकांची दिशाभूल करणारे आहे. याबद्दल गोवा भाजप सिसोदिया यांचा तीव्र निषेध करत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत, संघटन मंत्री सतीश धोंड यांच्यासह आपण दिल्ली येथे गेलो होतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सह प्रभारी दर्शना जर्डोश, बी एल संतोष यांच्या सोबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या विषयावर आम्ही चर्चा करत होतो. या दरम्यान खोटारडेपणासाठी प्रसिध्द असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गोमंतकीय नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे विधान केले. यासाठी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गोव्याचे नेतृत्व बदलले जाणार असल्याची अफवा पसरवली. विविध समाज माध्यमातून याची चर्चा सुरू झाली. अफवा पसरवण्यात महीर असलेल्या पक्षाने आमच्या पक्षात लक्ष घालण्याऐवजी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे नेतृत्व बदलण्याची भाजपची परंपरा नाही. तसेच राज्याचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असा निर्वाळा श्री. तानावडे यांनी दिला.









