ऑनलाईन टीम / मुंबई :
सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या आयुक्त पडवरून उचलबांगडी केलेल्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधक आक्रमक झाले असून अनिल देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.
त्यातच भाजपने ट्विटरद्वारे आज पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता शरद पवार यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पवारांच्या दाव्याची पोलखोल केली. ते म्हणाले, अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसल्याचे सांगत शरद पवारांना चुकीची माहिती दिली असल्याचे म्हटले आहे.