सुमारे साडेतीन हजार लोकांनी घेतले देव दर्शन
प्रतिनिधी/ मडगाव
भाजप सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री देव दर्शन यात्रेला गोव्यातील लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. काल गुरुवारी मडगाव मतदारसंघातील भाविकांना घेऊन तिरूपतीकडे रवाना झाली. या रेल्वेगाडीत सुमारे एक हजार प्रवासी होते. त्यात काही वास्को मतदारसंघातील भाविकांचा समावेश होता. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या रेलगाडीला हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, समाज कल्याण खात्याच्या संचालक संध्या कामत व कर्मचारी रश्मी तसेच मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, भाजपचे कार्यकर्ते सुबोध गोवेकर व इतरांची उपस्थिती होती.
अन् प्रतिसाद वाढला…
या योजनेसाठी सुरवातीला लोकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ही योजना मार्गी लागणार का अशी शंका होती. अशावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे मतदारसंघातील लोकांना सर्वात प्रथम तिरूपतीला घेऊन जाण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. त्याप्रमाणे सांगेतील लोकांनी प्रतिसाद दिला. तिरूपतीचे दर्शन घेतले. या संपूर्ण यात्रेत लोकांना उच्च दर्जाची सेवा मिळाली आणि त्यानंतर प्रतिसाद वाढत गेला. आज सुमारे आणखीन तीन रेलगाडय़ा भरतील येवढे लोक प्रतिक्षेत असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
गेले दोन-तीन महिने समाज कल्याण खात्याचे सर्व कर्मचारी मुख्यमंत्री देव दर्शन यात्रेच्या कामात व्यस्थ आहेत. येवढा जबरदस्त प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा निधी अभावी बंद करू नये, कारण या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यावेळी म्हणाले.
आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार लोकांनी या देव दर्शन यात्रेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून एकही तक्रार आलेली नाही. यात्रेच्या दरम्यान निवास व्यवस्था, खाण-जेवण व देव दर्शन अत्यंत सुलभरित्या होत आहे. ज्या लोकांना कधी देव दर्शन शक्य झाले नाही. अशा लोकांसाठी ही सुवर्ण संधी असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले.
योजनेबद्दल जबरदस्त अभिप्राय
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारने ही योजना आखली होती. ही योजना अत्यंत चांगली असल्याचे आपण मानतो. सुभाष फळदेसाई हे जेव्हा समाज कल्याणमंत्री झाले, तेव्हा त्यांनी पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावली. ही योजना मार्गी लावण्याचे श्रेय मंत्री सुभाष फळदेसाई यांना जाते. देव दर्शन यात्रेतील पहिली रेलगाडी मडगाव रेल स्थानकावरून निघाली होती. त्यानंतर जो अभिप्राय मिळाला तो जबरदस्त होता.
सहसा सरकारने एखादी योजना मार्गी लावली की, त्यावर टीका होत असते. मात्र, मुख्यमंत्री देव दर्शन यात्रे बद्दलचा अभिप्राय खुपच चांगला आहे. आज अनेक जण मुख्यमंत्री देव दर्शन यात्रेला जाण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यावेळी बोलताना म्हणाले. एक चांगली योजना राबविली जात असल्याबद्दल आमदार श्री. कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे अभिनंदन केले.
आत्ता पर्यंत तिरूपतीला दोन रेलगाडय़ा तर एक रेलगाडी वालंकिणीला जाऊन आली. काल गुरूवारी तिरूपतीला तिसरी रेलगाडी रवाना झाली. या रेलगाडीत देव दर्शनाला गेलेले सर्वजण मडगाव मतदारसंघातील भाविक आहेत. तर काहीजण वास्को मतदारसंघातील आहे.
एका रेलगाडीवर सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये खर्च
मुख्यमंत्री देव दर्शन यात्रेला जाणाऱया एका रेलगाडीवर सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये खर्च येत असल्याची माहिती समाज कल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत यांनी दिली. या योजनसाठी सरकारने 15 कोटीची तरतूद केली आहे. आत्ता पर्यंत साडेचार कोटी रूपये खर्च करण्यात आलेले आहेत. प्रयेक प्रवाशावर सुमारे साडे दहा हजार रूपये खर्च येत असल्याची माहिती देण्यात आली. अनेक यात्रेकरू शेवटच्या क्षणी यात्रेत सहभागी होऊ शकत नाही. अशावेळी प्रतिक्षेत असलेल्यांना यात्रेत सामावून घेतले जाते.
आत्ता पर्यंत दक्षिण गोव्यातील लोकांनीच मुख्यमंत्री देव दर्शन यात्रेचा लाभ अधिक प्रमाणात घेतलेला आहे. पण, पुढील वेळी उत्तर गोव्यातील लोकांना देव दर्शन यात्रेत जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातील लोक फेब्रुवारी 2023 मध्ये शिर्डीला जाणार असून आमदार रूडाल्फ यांच्या मतदारसंघातून देखील मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याचे सांगण्यात आले. जानेवारीत त्यांना संधी मिळणार आहे.









