ऑनलाईन टीम / नाशिक :
पूर्वीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची वाटणी होत होती, आताच्या नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडेच राहणार आहे. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
नाशिकमध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा 5 वर्षासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा निर्णय एकमुखाने घेण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची वाटणी होणार नाही. 5 वर्ष हे पद सेनेकडे राहील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात हेच म्हटले आहे. केवळ प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा आहे. लोकांमध्ये संभ्रम नको म्हणून मला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडेच, या वक्तव्याचा पुनरुच्चार करावा लागला.