पुढील निवडणुकीत आपणच सत्तेवर येणार असे गृहित धरून काँग्रेसच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण, याचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार समर्थकात कलगीतुरा रंगला आहे.
कर्नाटकातील पक्षांतर्गत असंतोषावर भाजपने पडदा टाकला आहे. सध्या तरी नेतृत्वबदल होणार नाही. येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री असतील, असे पक्षाचे प्रभारी अरुण सिंग यांनी स्पष्ट केले आहे. नेतृत्वबदलाची मागणी करणाऱया असंतुष्टांवर कारवाई करण्याची शिफारसही त्यांनी हायकमांडकडे केली आहे, अशी माहिती मिळाली आहे. यावरून कर्नाटकात नेतृत्वबदल केल्यास कोणती परिस्थिती निर्माण होईल, याची चाचपणी अजूनही सुरू राहणार हे स्पष्ट आहे. पक्षप्रभारींनी इशारा दिल्यानंतरही पक्षांतर्गत असंतुष्टांच्या कारवाया सुरूच आहेत. माजी मंत्री व निजदमधून भाजपमध्ये आलेले ज्ये÷ नेते एच. विश्वनाथ यांनी तर पाटबंधारे विभागात 2 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा उघड आरोप केला आहे. आणखी एक आमदार अरविंद बेल्लद यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा आपल्याच सरकारवर आरोप केला आहे. सी. पी. योगेश्वर यांनी उघडलेली आघाडी अजूनही सुरूच आहे.
एकीकडे नेतृत्वबदलासाठी भाजपमध्ये संघर्ष सुरू असतानाच हा संघर्ष थांबला नाही तर येडियुराप्पा यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूचे राज्यपालपद बहाल करून प्रल्हाद जोशी यांच्याकडे कर्नाटकाचे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. नेतृत्वबदल केल्यानंतर जर बंडाळी वाढली तर निजदबरोबर पुन्हा घरोबा करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. असे झाल्यास या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा पुन्हा निजदला होणार आहे. केवळ 40 जागांवर विजय मिळवूनही या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांची पाचही बोटे तुपात आहेत. नेतृत्वबदल झालाच आणि येडियुराप्पा समर्थकांनी बंडखोरी केली तर कुमारस्वामी यांची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. असाच विचार येडियुराप्पा हेही करत नसतील, याची शाश्वती नाही. त्यामुळेच की काय, पक्षप्रभारींनी सध्या तरी नेतृत्वबदल होणार नाही. त्यामुळे बंडोबांनी आपले तोंड बंद ठेवावे. तुम्हाला टीकाच करायची असेल तर राहुल गांधी, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार या विरोधी पक्षातील नेत्यांवर करा, असा सल्ला अरुण सिंग यांनी असंतुष्टांना दिला आहे. सत्ताधारी भाजपची ही परिस्थिती तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यावर कलगीतुरा रंगला आहे. पुढचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच असतील, असे उघड वक्तव्य आमदार जमीर अहमद यांनी केले आहे. काँग्रेसमधील आणखी काही सिद्धरामय्या समर्थकांनीही असाच राग आळवला आहे. त्यामुळे साहजिकच या चर्चेने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा स्वाभिमान दुखावला आहे. शिवकुमार सध्या दिल्ली दौऱयावर आहेत. राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांनी चर्चाही केली आहे. भाजपमधील संघर्षाचा फटका पुढच्या निवडणुकीत त्यांना बसणार. त्यामुळे साहजिकच आपणच सत्तेवर येणार, या समजुतीने काँग्रेसच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण, याचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार समर्थकात कलगीतुरा रंगला आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण, हे आत्ताच जाहीर करा, असे उघड आव्हान काँग्रेसला विरोधकांनी दिले आहे. जर आताच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला तर साहजिकच काँग्रेसलाही खिंडार पडणार आहे.
सिद्धरामय्या हे मुरब्बी राजकारणी आहेत. पुढच्या निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होणार, याची वाच्यता त्यांनी स्वतः केली नाही. मात्र, त्यांचे समर्थक अधूनमधून हा राग आळवत असतात. डी. के. शिवकुमार यांना डिवचत असतात. भाजप-काँग्रेसमधील अशा घडामोडींबरोबरच आणखी एक छुपी बाब उघड झाली आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुंबईत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सीडी प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात मुख्यमंत्री व सरकार आपल्या मागे ज्या पद्धतीने उभे रहायला हवे होते, त्या पद्धतीने आपल्या पाठीशी राहिले नाहीत. कर्नाटकात भाजप सत्तेवर येण्यास आपण व 17 आमदार कारणीभूत आहोत. त्यामुळे आपल्याला पुन्हा मंत्रिपद द्यावे, यासाठी त्यांनी सरकारवर दबाव वाढविला आहे. आपल्याला नाही तर भाऊ भालचंद्र जारकीहोळी किंवा आपल्या मुलाला मंत्रिपद द्यावे. यासाठी त्यांनी जोर लावला आहे. सध्या तरी त्यांना मंत्रिपद मिळेल, याची खात्री नाही. कारण सीडी प्रकरणासंबंधीचे अनेक खटले आजही न्यायप्रविष्ट आहेत. या प्रकरणात आपल्याला नाहक गोवल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
सोमवारपासून कर्नाटकात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातच डॉ. देविशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ समितीने दोन ते तीन महिन्यात कर्नाटकात कोरोनाची तिसरी लाट आदळणार आहे. त्यामुळे आतापासूनच आरोग्य सुविधा वाढविण्याची शिफारस केली आहे. तिसऱया लाटेत मुलांना बाधा होणार आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून द्यावीत. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, याची खबरदारी घ्यावी. बालरोग तज्ञांची सेवा घ्यावी. लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा अनेक शिफारशी केल्या आहेत. प्रत्येक इस्पितळात किमान तीन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करून ठेवावा. लहान मुलांसाठी नवी इस्पितळे सुरू करावीत, अशा शिफारशीही त्यांनी केल्या आहेत. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला तिसऱया लाटेचा कहर असणार आहे, असा धोक्मयाचा इशारा या तज्ञ समितीने दिला आहे. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी सरकारची तयारी सुरू असतानाच कर्नाटकातही डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली म्हणून गाफिल राहिल्यास कदाचित कोरोनाचा पुन्हा उदेक होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकालाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.








