भाजप विधीमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब : आजच करणार सत्ता स्थापनेचाही दावा : 23 रोजी शपथविधीचा दिमाखदार सोहळा
प्रतिनिधी / पणजी
स्पष्ट ’बहुमत’ मिळूनही मुख्यमंत्रीपदाबाबत ’एकमत’ होत नसल्याने रखडलेला नव्या सरकारचा शपथविधी अखेर येत्या दि. 23 रोजी होणार आहे. तत्पूर्वी भाजप विधीमंडळाच्या आज 21 रोजी होणाऱया बैठकीत गटनेत्याची घोषणा होणार असून त्याद्वारे ’राज्याचा मुख्यमंत्री कोण?’ यासंबंधी तमाम गोमंतकीयांच्या शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेवर पडदा पडणार आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजित राणे यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग चालविले आहे. हिमाचलचे राज्यपाल असलेले गोव्याचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याही नावाची चर्चा असल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडते त्याचाही उलगडा आज होणार आहे. त्यातून ’दोघांच्या भांडणात तिसऱयाचा लाभ’ असाही प्रकार होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोदी, शहा यांची उपस्थितीची शक्यता
शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल रविवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप मुख्यालयात आज सायंकाळी 4 वाजता होणाऱया बैठकीत केंद्रीय निरीक्षक म्हणून कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि एल. मुरुगन, तसेच सी टी रवी, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असेल. गटनेता निवडीनंतर भाजपतर्फे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल, असे तानावडे म्हणाले. भाजपला गोव्यासह अन्य तीन राज्यातही बहुमत मिळाले असल्याने सर्वच राज्यात विधीमंडळ गटनेता निवड प्रक्रिया लांबली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी दिमाखदार सोहळय़ात शपथविधी
त्यानंतर 23 रोजी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर दिमाखदार सोहळ्यात सरकारचा शपथविधी होईल. आधी हा सोहळा राजभवनवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहात होईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु त्या सभागृहाची व्याप्ती लक्षात घेता तेथील सोहळा यादगार, दिमाखदार होणे कठीण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो सोहळा श्यामाप्रसाद स्टेडियमवर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. या सोहळ्यास अनेक केंद्रीय नेत्यांसह अन्य राज्यातील वरिष्ठ नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येईल, असे तानावडे यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय मगोचे दोन आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे 25 आमदारांचे भक्कम बलाबल असतानाही निवडणूक निकाल होऊन आठवडा उलटला तरी सरकार स्थापनेचे घोडे अडले होते. त्यावरून राज्यात उलटसुलट चर्चांना उत आला होता.
मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारांची संख्या वाढल्याने सरकार स्थापनेचे घोडे अडले होते हे आता भाजपमधीलच काही नेत्यांच्या तोंडी स्पष्ट झाले आहे. दावेदार कुणीच नसता तर एव्हाना मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची वर्णीही लागली असती. परंतु विश्वजित राणेही शर्यतीत उतरले व त्यांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग चालविले. त्यावरून हा तिढा सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली.
एका अनपेक्षित घडामोडीत आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा राज्यातील राजकीय स्थितीचाही प्रगल्भ अनुभव असलेले नेते राजेंद्र आर्लेकर यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचेही नाव जोडले गेले की काय यावरुनही जोरदार चर्चा चालली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी तेही बाजी मारतील की काय, अशीही चर्चा सुरू होती.
डॉ. सावंत व राणे या दोन्ही नेत्यांनी शनिवारी दिल्लीत मोदी आणि शहा यांची भेट घेतली. ही बैठक बरीच उशिरां म्हणजे मध्यरात्रीपर्यंत चालली. त्यानंतर रविवारी सकाळी डॉ. सावंत गोव्यात परतले. तर राणे दोन्ही निरीक्षकांच्या सोबतीने आज दाखल होणार आहेत.
गोव्यात परतल्यानंतर डॉ. सावंत यांनी पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, संजीव देसाई, दत्ता खोलकर, आदी, स्थानिक वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेऊन शपथविधी सोहळा, आदी विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, डॉ. प्रमोद सावंत यांनी कालच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीची तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. या दरम्यान त्यांना अनेक संकटे, अडथळ्यांचा सामना करावा लागला तरीही विकासकामांचाही धडाका चालूच ठेवत त्यांनी गोव्याला विकसनशील राज्य म्हणून पुढे नेण्याचे प्रयत्न केले. त्यातूनच नुकत्यात झालेल्या निवडणुकीतही मतदारांनी विजयश्री त्यांच्याच गळ्यात घातली. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी 19 आमदार विजयी ठरले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळणे स्वाभाविक आहे. परंतु दावेदार वाढल्यामुळे त्यांची निवडही लांबली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप विधीमंडळाची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीतच विधीमंडळ नेता म्हणजेच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे.
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन : सावंत
डॉ. सावंत सध्या गोव्यात असून आज होणाऱया निवडीबद्दल विचारले असता, ’या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल तो आपणाला मान्य असेल, तसेच पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारेन’, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.









