फोंडा तालुक्याचे दुसरे पोलीस स्थानक म्हार्दोळात : मंत्री गोविंद गावडे यांचे प्रयत्न
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा-पणजी महामार्गावर असलेली म्हार्दोळ पोलीस चौकी (आऊट पोस्ट) चे येत्या 19 डिसेंबर 2020 रोजी म्हार्दोळ पोलीस स्थानक म्हणून रूपांतर करण्यात येणार असल्याची संकेत स्थानिक आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिले आहे. त्यासंबंधी हालचालीचा वेग आला असून नुकतेच मंत्री गावडे यांनी येथील आऊट पोस्टला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर म्हार्दोळ पोलीस स्थानकासाठी कायमस्वरूपी इमारत 3500 चौ.मि. विर्स्तीण जागेत मंगेशी येथे उभारण्यात येणार आहे. त्य़ामुळे अतिभारासह काम करत असलेल्या फोंडा पोलिस स्थानकावरील ताण कमी होईल. फोंडा तालुक्यालातील हे दुसरे पोलीस स्थानक ठरेल. एकंदरीत 19 डिसेंबरनंतर म्हार्दोळ चौकीवर फोंन लावल्यास जय हिंद ! म्हार्दोळ पोलिस स्टेशन असा सुर कानी पडणार आहे.
फोंडा तालुक्यात माशेल, शिरोडा, उसगांव, धारबांदोडा, म्हार्दोळ असे अनेक विकल्प पोलीस स्टेशनसाठी रांगेत उभे आहेत. अंत्रुज महालात देवदेवळाबरोबर स्थलांतरीत बिगरगोमंतकीयांचाही संख्या मोठया प्रमाणात आहे. मडकई, कुंडई, बेतोडा,उसगांव औद्यागिक वसाहतीमुळेही पोलिसांना हाय अलर्टवर रहावे लागते. राज्यातील एकमेव असणारे प्रकल्प गोवा डेअरी, संजीवनी साखर कारखाना, गोव मांस प्रकल्प यापासून उद्भवणारे कायदा व सुव्यवस्थाचे प्रश्न, तसेच शहर परिसरात फोफावणारा मटका व्यवसाय यामुळे दुसरे पोलीस स्थानक हे फेंडा पोलीस स्थानकाचे ताण निश्चितच कमी करणारे ठरणार आहे.
फोंडा पोलिस स्थानकांचे कार्यक्षेत्र अवाढव्य
फोंडा पोलिस स्थानकाचे कार्यक्षेत्र अवाढव्य आहे. फोंडा शहरात बाणस्तारी पूल ते उसगांव पूल, बोरी पूल ते दाभाळ पूलपर्यंत, धारबांदोडय़ाची एक पंचायत पर्यंत विस्तारलेले असल्याने कार्यक्षमता व कर्तव्य पार पाडताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असते. पोलिस स्थानकात अनैसर्गिक मृत्य़ूच्या तक्रारीत उपनिरीक्षक झुंपले असून त्यांच्या दावणीला सहाय्यक उपनिरीक्षक नसल्याने उपनिरिक्षकांवर ताण वाढत असतो. अपुऱया पोलीस हवालदारांसह फोंडा पोलिस स्थानकाचा कारभार व तक्रार निवारण करण्याची वेळ नित्य़ाचीच झालेली आहे.
बारावा तालुका तरीही धारबांदोडा फोंडय़ात
फोंडा तालुक्यातील 19 पंचायती व धारबांदोडय़ातील 1 पंचायत व त्याचबरोबर फोंडा पालिकेला सुरक्षा पुरविणारे काम फोंडा पोलिस करत आहे. याकामी कर्तव्यनिष्ठ जबाबदारी निभावणारे फोंडय़ाचे सिंघम निरीक्षक हरिष मडकईकर कार्यतत्परतेने काम करीत आहे. फोंडा हे मध्यावर्ती ठिकाण असून बिगरगोमंतकीयांचा भरणा जास्त आहे. तालुक्यात बेतोडा, कुंडई, मडकई व उसगांव भागात औद्योगिक वसाहती असल्यामुळे बिगरगोमंतकीयांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करावे लागतात. अतिमहनीय व्यक्तीसाठी पोलिस बंदोबस्त, सणासुदीच्या दिवसात गस्त, चोऱयाच्या वाढत्या तक्रारी, मोठय़ा देवस्थानात खासगी सुरक्षारक्षक पुरवून ही कसर कमी केली आहे. पण गेल्या दशकभरात छोटया देवळात चोरीमारीचे वाढते प्रमाण हे पोलिसांना गस्त वाढविण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे.
धारबांदोडयावर फोंडा–कुळे–कुडचडे अशी तिहेरी नजर
धारबांदोडा हा बारावा तालुका म्हणून नावारूपास येऊन 12 वर्षाचा कार्यकाळ होत आला असला तरी इकडे साधनसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. धारबांदोडा तालुक्यात एकूण पाच पंचायतींचा समावेश आहे. दाभाळ, साकोर्डा, धारबांदोडा व कुळे त्यापैकी सार्कोडा, कुळे, मोले व धारबांदोडा पंचायतीचा 25 टक्के भाग कुळे पोलीस स्थानाकाच्या हद्दीत येतो. दाभाळ पंचायत कुडचडे पोलीस स्थानकात हद्दीत येत असून धारबांदोडा पंचायतीचा बहुतेक भागत फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत आहे. त्य़ामुळे धारबांदोडा तालुक्यावर फोंडा-कुळे-कुडचडे स्थानकाना तिहेरी नजर ठेवावी लागत आहे. धारबांदोडा तालुक्यात सरकारी कार्यालये सुरू होण्याच्या मार्गावर असून धारबांदोडा पोलिस स्थानक होणार असा ठाम विश्वासही येथील नागरिकांना आहे. राष्ट्रिय महामार्ग व खनिज वाहतूकिमुळेही स्थानक आवश्यक आहे. धारबांदोडा परिसरात पोलिस स्थानकाचा प्रस्ताव मान्य झाल्यास उसगांव, सार्कोडा, धारबांदोडा, गांजे, बोळकर्णे या ठिकाणी नियंत्रण ठेवता येईल. शेतकरी भागातील वाढता जनावरांच्या उद्रेक असून यावर उपाययोजना व तक्रार निवारणीसाठी, अपघाताच्या वाढत्या तक्रारीना फोंडा पोलिसांवरील ताण कमी होऊ शकतो.
शिरोडय़ासाठी उपाययोजना करावी
चोरी, बलात्कार, मारामारी, खून, आत्महत्या, संप-बंद अतिमहनीय व्यक्तीसाठी सुरक्षा देण्याचा बोजा पोलिसांवर असतो. आत्महत्येच्या प्रकाराना बोरी जुवारीनदीचे पात्र हे वरदान ठरलेले आहे. शिरोडा भागात 20 वर्षापुर्वीचा शिरोडा राहिलेला नसून येथे होणाऱया अमावस्या उत्सव, फेस्तसारख्या सणासुदी, मंगळवारचा आठवडी बाजाराची वर्दळ जास्त असल्याने येथील ओऊटपोस्टवर ताण वाढलेला आहे. शिरोडा येथे आयुर्वेदिक, रायेश्वर, हॉमियोपॅथीसारख्या कॉलेज असल्याने बिगरगोमंतकीय विद्यार्थ्याचा भरणा जास्त आहे. बोरी ते कापशे पंचवाडी पर्यंत शिरोडा ओऊटपोस्टच्या हद्दीत येत असल्याने शिरोडा परीसराची भौगोलिक रचना पाहता येथे पोलिस स्थानकाची गरज भविष्यात भासू लागते.
गुन्हेगारांचे माग काढणारे पोलिस हवेत
अवाढव्य क्षेत्र असूनही फोंडा पोलीस स्थानकात एकदा रूजू झालेले पोलिस निरीक्षकांना मात्र येथून जाण्याचा मोह आवरत नाही. बदलीची चाहूल लागल्यानंतर बदली रद्द करण्यासाठी हालचाली करतानाही दिसतात, यामागील गुपित मात्र आजपर्यत कुणाला कळलेले नाही. फेंडा पोलीस स्थानकात मनुष्यबळाची कमतरता ही कायम राहिलेली आहे. इवल्याश्या गोव्यात पोलिस भरती आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे, आजच्या पोलिसांनी बेसिक पोलिसींग व गुप्त माहिती स्रोत वाढविणे गरजेचे आहे. कामातील दर्जा व कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे खाकी वर्दीवाले जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत पोलीस कार्यक्षम होणार नाही. पोलिस सेवेत कामाची आवड, गुन्हेगाराचा माग काढणारे व कौशल्य असलेले पोलीस रूजू होणे गरजेचे आहे. तक्रारदारांचे तक्रारीचे निवारण न करता क्राईम जिरो दाखविण्यात पोलीस स्थानके धन्यता मानणार असेल तर स्थानकांची संख्या वाढवूनही काहीच उपयोक होणार नाही. हाय अलर्ट राहणारे पोलीस खाते अधिक सुस्तावेल.









