आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर रोमांचक विजय
वृत्तसंस्था/ मुंबई
प्रारंभी अवघ्या 27 धावात 5 बळी घेण्याचा पराक्रम गाजवणाऱया हर्षल पटेलने फलंदाजीत शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना त्यावेळी देखील विजयी फटका लगावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा जबरदस्त झटका दिला व या हंगामात विजयी सलामी दिली. या लढतीत मुंबईने निर्धारित 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या तर प्रत्युत्तरात आरसीबीने 20 षटकात 8 बाद 160 धावांसह विजय संपादन केला. शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या या लढतीत आरसीबीच्या एबी डीव्हिलियर्सच्या 27 चेंडूतील 48 धावांची खेळी अनन्यसाधारण महत्त्वाची ठरली.
विजयासाठी 160 धावांचे आव्हान असताना एबी डीव्हिलियर्स (48), ग्लेन मॅक्सवेल (28 चेंडूत 39), विराट कोहली (29 चेंडूत 33) यांची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. मुंबईच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी आरसीबीच्या फलंदाजांवर जरुर दडपण आणले. पण, बुमराहच्या गोलंदाजीवर एबीने हल्ला चढवला आणि तेथून सामना मुंबईच्या हातातून निसटत गेला. एबी डीव्हिलियर्स निर्णायक क्षणी जरुर धावचीत झाला. मात्र, तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. जान्सनच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी धावेची गरज असताना हर्षल पटेलने विजयी धाव घेतली आणि आरसीबीला हव्याहव्याशा विजयावर गवसणी घालता आली.
ख्रिस लिनची फटकेबाजी

तत्पूर्वी, सलामीवीर ख्रिस लिन (35 चेंडूत 49), सूर्यकुमार यादव (23 चेंडूत 31) व इशान किशनच्या (19 चेंडूत 28) फटकेबाजीनंतर देखील हर्षल पटेलच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सला 20 षटकात 8 बाद 159 धावांवर समाधान मानावे लागले. हर्षलने 27 धावांमध्येच इशान किशन, हार्दिक पंडय़ा, पोलार्ड, कृणाल, मार्को जॅन्सेन असे 5 बळी घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा आल्या. आरसीबीतर्फे हर्षलने सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजी करत 27 धावांमध्येच 5 फलंदाज गारद केले.
विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि रोहित (15 चेंडूत 19) स्वस्तात धावबाद झाल्याने विराटसेनेसाठी ही उत्तम सुरुवातही झाली. त्यानंतर मात्र ख्रिस लिन व पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी सुरु करणाऱया सूर्यकुमार यादव या जोडीने फटकेबाजी करत चांगलाच रंग भरला.
त्याने आरसीबीच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजांवर तुटून पडण्याचा सिलसिला सुरु करत वर्चस्व गाजवण्यावर लक्ष केंद्रित केले. आश्चर्य म्हणजे फलंदाजांच्या फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱया या क्रिकेट प्रकारात विराटसेनेने चक्क 7 गोलंदाज खेळवले आणि यातील प्रत्येक गोलंदाजाला किमान एक षटक तरी गोलंदाजी दिली.
लिन-सूर्याची 70 धावांची भागीदारी
रोहित धावचीत झाल्यानंतर ख्रिस लिन व सूर्यकुमार यादव यांनी दुसऱया गडय़ासाठी 7 षटकात 70 धावांची दमदार भागीदारी साकारली.
जेमिसनच्या चेंडूवर यष्टीमागे एबी डीव्हिलियर्सकडे झेल देण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने 31 धावांचे योगदान दिले. जेमिसनच्या ज्या षटकात बाद झाला, त्याच षटकात सूर्यकुमारने 83 मीटर्सचा खणखणीत षटकार खेचला होता. मात्र, नंतर जेमिसनने त्याला बाद करत हिशेब चुकता केला.
युवा फलंदाज इशान किशनने सावध सुरुवात केल्यानंतर काही जोरदार फटके लगावण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर ख्रिस लिनचा आक्रमक फटक्याचा प्रयत्न फसला आणि सुंदरने मागे धावत झेल पूर्ण केल्यानंतर त्याची खेळी संपुष्टात आली. हार्दिक पंडय़ा पायचीत झाल्यानंतर मुंबईला आणखी एक धक्का बसला. नंतर इशान किशनला पायचीत नसल्याचा निर्णय मैदानी पंचांना फिरवावा लागला. आरसीबीने या निर्णयाविरुद्ध डीआरएस घेतल्यानंतर रिप्लेत तो बाद असल्याचे स्पष्ट झाले.
वॉशिंग्टन सुंदरचा ‘कॅच ऑफ द मॅच’!

डावातील 13 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने स्वतःच्या गोलंदाजीवर मागे धावून जात अप्रतिम झेल टिपला आणि हाच जणू कॅच ऑफ द मॅच ठरला. मिडलस्टम्पच्या रोखाने येणाऱया चेंडूवर ख्रिस लिनने प्रंटफूटवरुन लाँगऑनच्या दिशेने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. एबीने यावेळी सुंदरला झेल घेण्याची सूचना केली आणि सुंदरने देखील पूर्ण ताकदीने मागे धावत अंतिम क्षणी चेंडूचा अचूक अंदाज घेत स्वतःला झोकून दिले आणि अप्रतिम झेल टिपला. लिनने येथे 35 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले.
त्या शेवटच्या चेंडूवर काय घडले?
डावातील शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आरसीबीला एकेरी धावेची आवश्यकता असताना नवोदित फलंदाज हर्षल पटेल क्रीझवर होता. आयपीएल नेतृत्वात माहीर रोहितने शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट व मिडविकेटला फक्त एक क्षेत्ररक्षक मागे, असे कौशल्यपूर्ण क्षेत्ररक्षण लावले आणि जान्सनने या क्षेत्ररक्षणाला अनुरुप यॉर्कर टाकत प्रयत्न पणाला लावले. पण, सुदैवाने हर्षल वेळीच बॅट खाली आणू शकला आणि चेंडू बॅटची कड घेऊन बुमराहच्या दिशेने गेला. बुमराहच्या डावीकडे हा चेंडू असल्याने त्याने तो कलेक्ट करेतोवर आरसीबीच्या फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आणि या हंगामातील पहिला विजय थाटात साजरा केला!
धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा धावचीत (कोहली-चहल) 19 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ख्रिस लिन झे. व गो. वॉशिंग्टन सुंदर 49 (35 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), सूर्यकुमार यादव झे. डीव्हिलियर्स, गो. जेमिसन 31 (23 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), इशान किशन पायचीत गो. हर्षल पटेल 28 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा पायचीत गो. पटेल 13 (10 चेंडूत 2 चौकार), केरॉन पोलार्ड झे. सुंदर, गो. पटेल 7 (9 चेंडूत 1 चौकार), कृणाल पंडय़ा झे. ख्रिस्तियन, गो. पटेल 7 (7 चेंडूत 1 चौकार), जान्सेन त्रि. गो. पटेल 0 (2 चेंडू), राहुल चहर नाबाद 0 (0 चेंडू), बुमराह नाबाद 1 (2 चेंडू). अवांतर 4. एकूण 20 षटकात 8 बाद 159.
गडी बाद होण्याचा क्रम
1-24 (रोहित, 3.6), 2-94 (सूर्यकुमार, 10.6), 3-105 (ख्रिस लिन, 12.5), 4-135 (हार्दिक, 15.6), 5-145 (इशान, 17.4), 6-158 (कृणाल, 19.1), 7-158 (केरॉन, 19.2), 8-158 (मार्को जान्सेन 19.4).
गोलंदाजी ः मोहम्मद सिराज 4-0-22-0, काईल जेमिसन 4-0-27-1, यजुवेंद्र चहल 4-0-41-0, शाहबाज अहमद 1-0-14-0, हर्षल पटेल 4-0-27-5, डॅनिएल ख्रिस्तियन 2-0-21-0, वॉशिंग्टन सुंदर 1-0-7-1
आरसीबी ः वॉशिंग्टन सुंदर झे. लिन, गो. कृणाल 10 (16 चेंडू), विराट कोहली पायचीत गो. बुमराह 33 (29 चेंडूत 4 चौकार), रजत पाटीदार त्रि. गो. बोल्ट 8 (8 चेंडूत 1 चौकार), ग्लेन मॅक्सवेल झे. लिन, गो. जान्सन 39 (28 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), एबी डीव्हिलियर्स धावचीत (कृणाल-इशान) 48 (27 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), शाहबाज नदीम झे. कृणाल, गो. जान्सन 1 (2 चेंडू), डॅनिएल ख्रिस्तियन झे. चहर, गो. बुमराह 1 (3 चेंडू), काईल जेमिसन धावचीत (बुमराह) 4 (4 चेंडू), हर्षल पटेल नाबाद 4 (3 चेंडू), मोहम्मद सिराज नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 12. एकूण 20 षटकात 8 बाद 160.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-36 (वॉशिंग्टन सुंदर, 4.2), 2-46 (रजत, 5.5), 3-98 (विराट, 12.3), 4-103 (मॅक्सवेल, 14.1), 5-106 (शाहबाज, 14.6), 6-122 (ख्रिस्तियन, 16.3), 7-152 (जेमिसन, 18.5), 8-158 (डीव्हिलियर्स, 19.4).
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट 4-0-36-1, बुमराह 4-0-26-2, मार्को जान्सन 4-0-28-2, कृणाल पंडय़ा 4-0-25-1, राहुल चहर 4-0-43-0.









