आयएसएल फुटबॉल स्पर्धा : चेन्नईन एफसीला 2-1 गोल्सनी पराभवाचा धक्का
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एका गोलच्या पिछाडीनंतर मुंबई सिटी एफसीने आक्रमक खेळाचे दर्शन घडवून चेन्नईन एफसीला 2-1 गोल्सनी पराभूत केले. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेला आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील हा सामना चांगलाच रंगला. मुंबई सिटीसाठी हर्नन सांताना आणि ऍडम फाँड्रेने तर चेन्नईन एफसीचा एकमेव गोल जाकूब सिल्वेस्टरने नोंदविला.
आरंभीच्या पराभवानंतर मुंबई सिटीचा हा सलग चौथा विजय ठरला. पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबईचे आता 5 सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. चांगला खेळ करूनही पराभूत झालेल्या चेन्नईन एफसीचे आता 4 सामन्यांतून 4 गुण कायम असून ते आठव्या स्थानावर आहेत.
सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला चेन्नईन एफसीने धोकादायक चाल रचली. यावेळी राफायल क्रिव्हेलारो आणि इनीस सिपोव्हीचने केलेल्या चालीवर जाकूब सिल्वेस्टरने हाणलेला फटका गोलबारच्या वरून गेला. मुंबई सिटीने सामन्याच्या आठव्या मिनिटाला चेन्नईनचा बचाव भेदला, मात्र यावेळी हय़ुगो बूमोसने दिलेल्या पासवर रेनीर फर्नांडिसचा गोल करण्याचा यत्न चेन्नईनचा डिफेंडर सिपोव्हीचने हाणून पाडला.
दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात आक्रमक खेळ केला. 34व्या मिनिटाला हय़ुगो बुमोसचा गोल करण्याचा यत्न वाया गेल्यानंतर 40व्या मिनिटाला चेन्नईन एफसीने आघाडीचा गोल नोंदविला. यावेळी लालरियानझुआला छांगटेने उजव्या बगलेतून रचलेल्या चालीवर त्याने दोन बचावपटूंना गुंगारा देत केलेल्या क्रॉसवर जाकूब सिल्वेस्टरने भेदले आणि चेन्नईन एफसीला आघाडीवर नेले.
चेन्नईनची ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेतील तिसऱया मिनिटाला मुंबई सिटीने बरोबरीचा गोल केला. हय़ुगो बूमोसने घेतलेल्या कॉर्नरवर हर्नन सांतानाने हेडरवर चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथला चकवित चेंडू जाळीत टोलविला.
दुसऱया सत्रातही उभय संघाचे समान वर्चस्व सामन्यावर आढळून आले. प्रथम 75व्या मिनिटाला अहमद जाहूने घेतलेल्या फ्रिकीकवर हय़ुगोने हेडरवर दिलेल्या चेंडूवर ताबा मिळवित ऍडम फाँड्रेने गोलरक्षक विशाल कैथला वेगळय़ा कोंडीत पकडले आणि मुंबई सिटीचा विजयी गोल नोंदविला. यानंतर दोन्ही संघांकडून घिसाडघाईचा खेळ झाला आणि यामुळे सामन्यावर ताबा मिळविण्यासाठी रेफ्री अजितकुमार मिती यांना खेळाडूंना कार्डे दाखवावी लागली. चार मिनिटांनंतर छांगटेचा गोल बाद करण्याचा यत्न गोलरक्षक अमरींदर सिंगने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळला.
चेन्नईनने शेवटच्या पंधरा मिनिटांत मुंबई सिटी एफसीवर चांगलाच दबाव आणला. कालच्या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार प्राप्त केलेला मुंबई सिटीचा बचावपटू मुर्तादा फॉलने केलेल्या अभेद्य बचावामुळे चेन्नईनचा विजय हुकला. फॉलने किमान तीन वेळा आपल्या संघावर होणारे गोल वाचविले. कालच्या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधीही मिळाल्या होत्या.









