वृत्तसंस्था/मुंबई
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ मुंबई संघाला सलग तिसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. इलाईट ई गटातील शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात हरियानाने मुंबईचा 8 गडय़ांनी पराभव केला. अन्य एका सामन्यात केरळने दिल्लीचा 6 गडय़ांनी पराभव केला. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले आणि त्याने एक बळीही मिळविला.
या स्पर्धेच्या साखळी गटातील मुंबईचा हा तिसरा पराभव असल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. साखळी फेरीतील त्यांचे दोन सामने अद्याप बाकी आहेत. या स्पर्धेच्या बाद फेरीसाठी प्रत्येक गटातील पहिले स्थान मिळविणारे संघ पात्र ठरणार आहेत. मुंबई संघाला या स्पर्धेत आपले खातेही अद्याप उघडता आलेले नाही. मुंबईने उर्वरित दोन सामने जिंकले तर त्यांचे 8 गुण होतील. पण त्यांना हे गुण बाद फेरीच्या प्रवेशासाठी पुरेसे ठरणार नाहीत. ई गटात केरळ पहिल्या स्थानावर आहे. त्यांचे 12 गुण झाले आहेत.
शुक्रवारच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचा डाव 143 धावांत आटोपला. अथर्व अंकोलेकरने 37 तर जैस्वालने 35 धावा जमविल्या. कर्णधार आदित्य तरेने 8, सर्फराज खानने 30 धावा जमविल्या. सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे यांना आपले खातेही उघडता आले नाही. मुंबईचे पाच गडी केवळ 56 धावांत तंबूत परतले होते. हरियानातर्फे जयंत यादवने 22 धावांत 4 तर अरुण छपरानाने 22 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हरियानाने 2 बाद 144 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. हरियाना संघातील हिमांशू राणाने 53 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 75 तर शिवम चौहानने नाबाद 43 धावा जमविल्या. मुंबईतर्फे अर्जुन तेंडुलकरने 34 धावांत 1 गडी बाद केला.
वानखेडे स्टेडियमवर ई गटातील अन्य एका सामन्यात केरळने दिल्लीचा 6 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकात 4 बाद 212 धावा जमविल्या. शिखर धवनने 77 तर ललित यादवने नाबाद 52 धावा केल्या. केरळतर्फे एस. श्रीशांतने 46 धावांत 2 बळी मिळविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केरळने 4 बाद 218 धावा जमवित हा सामना जिंकला. रॉबिन उत्थाप्पाने 91 तर विष्णू विनोदने नाबाद 71 धावा झळकविल्या. दिल्लीतर्फे ललित यादवने 33 धावांत 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई- सर्वबाद 143, हरियाना- 2 बाद 144, दिल्ली- 20 षटकात 4 बाद 212, केरळ- 4 बाद 218.









