ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा लवकर सुरू केली जाणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत.
याआधीच सरकारकडून महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ट्विटरवर प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

एका प्रवाशाने आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते की, याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणे खूप मोठा अन्याय आहे.

यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी, पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.








