ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, रुग्ण संख्या कमी झाल्यावर पुन्हा सुरू करण्यात आली होती. आता कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्याने पुन्हा एकदा लोकल सेवा बंद होऊ शकते असे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा दिले आहेत.
महाराष्ट्रासह राजधानी मुंबईतही कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दररोज 10 हजारांच्या पटीत वाढत असल्याने लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईतील लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्णपणे लोकल बंद करावी की, मागच्यावेळी असलेले निर्बंध पुन्हा लागू करावेत, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकार आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.