डेरारा हुरिसा ठरला विजेता, तब्बल 55 हजारपेक्षा अधिक धावपटूंचा समावेश
प्रतिनिधी/ मुंबई
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेच्या मानली जाणाऱया ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2020’मध्ये यंदाही इथिओपियन धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. सुटीचा दिवस आणि कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत धावपटूंमध्ये तब्बल 9 हजारांनी वाढ झाली, ही या मॅरेथॉनची आणखी एक विशेष बाब म्हणावी लागेल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ‘ड्रीम रन’ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा कंदील दाखवला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. यंदाचे मुंबई मॅरेथॉनचे 17 वे वर्ष आहे.
मॅरेथॉनमध्ये यंदा 55 हजारहून अधिक धावपटू धावले. पण याच दरम्यान मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक गजानन माजलकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याशिवाय अन्य सात धावपटूंनांही हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इथिओपियन धावपटूंची सरस कामगिरी
देश-विदेशातील तब्बल 55 हजार पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या या मुंबई मॅरेथॉनमध्ये रविवारी भल्या पहाटे सुरुवात झाली. मुंबईत गुलाबी थंडी सुरू असल्याने मॅरेथॉनवेळी धावपटूंमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथिओपिया आणि केनिया या आफ्रिकन देशांमध्ये जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली.
इथिओपियाच्या डेरारा हुरीसाने एलिट गटाचे विजेतेपद पटकावत नवीन विक्रमही प्रस्थापित केला. त्याने 2 तास 8 मिनिटे आणि 9 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करत 2016 चा विजेता गिदोन किपकेटरचा 2 तास 8 मिनिटे 35 सेकंद हा विक्रम मोडीत काढला. दुसऱया स्थानी इथिओपियाच्या आयेले ऍबशेरो 2 तास 8 मिनिटे 20 सेकंद तर बिर्हानू तेशोम 2 तास 8 मिनिटे 26 सेकंदसह तिसऱया स्थानी आले.
महिलांमध्ये इथिओपियाच्या ऍमेन बेरीसोने 2 तास 24 मिनिटे 51 सेकंदासह अव्वलस्थान पटाकावले. तर केनियाच्या रोदाह जेपकोरीरने 2 तास 27 मिनिटे 14 सेकंदांसह दुसरे आणि इथिओपियाच्याच हॅव्हन हैलूने 2 तास 28 मिनिटे 56 सेकंदांसह तिसरे स्थान पटाकावले.
पूर्ण मॅरेथॉन (पुरुष गट भारतीय) मध्ये श्रीतू बुगाथा 2 तास 18 मिनिटे 44 सेकंदासह सुवर्णपदक, शेर सिंग 2 तास 24 मिनिटांसह रौप्य आणि दुर्गा बहादूर बुधा 2 तास 24 मिनिटे 3 सेकंदासह कांस्यपदकाचे मानकरी ठरले. तसेच पूर्ण मॅरेथॉन (महिला गट भारतीय)मध्ये सुधा सिंग 2 तास 45 मिनिटे 30 सेकंदासह सुवर्ण, ज्योती गवते 2 तास 49 मिनिटे 14 सेकंदासह रौप्य आणि मोनिका आथरे 2 तास 58 मिनिटे 44 सेकंदासह कांस्यपदकाची मानकरी ठरली.
अर्धमॅरेथॉनमध्ये मराठी धावपटूंचे यश
अर्धमॅरेथॉनच्या महिला गटात महाराष्ट्राच्या धावपटूंनी चांगली कामगिरी केली. पारुल चौधरी 1 तास 15 मिनिटे 37 सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटाकावले. आरती पाटीलने 1 तास 18 मिनिटे 03 सेकंदात अर्धमॅरेथॉन पूर्ण करून रौप्यपदक पटाकावले. (आरती पाटील : कडगाव-गडहिंग्लज) तर नाशिकच्या मोनिका आथरेने 1 तास 18 मिनिटे 33 सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.
तर पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये तीर्था पुन याने 1 तास 05 मिनिटे 39 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक, मान सिंगने 1 तास 06 मिनिटे 06 सेकंदांसह रौप्यपदक, बलीअप्पा ए. बी. ने 1 तास 07 मिनिटे 11 सेकंद या वेळेसह कांस्यपदक पटकावले.