- 15,500 रुपयांचे सानुग्रह अनुदान
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने दिवाळी पूर्वीच गोड निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरा व्हावी यासाठी महापालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 15,500 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
पालिका आयुक्त चहल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा बोनस जाहीर केला. अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना 7750 रुपये, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 4700 रुपये, अनुदान प्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक यांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे.
- यंदा 500 रुपयांची वाढ
महापौरांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार पालिका कामगारांच्या बोनसमध्ये यंदाच्या वर्षी 500 रुपयांची वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे या बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर जवळपास 115 कोटींचा आर्थिक भारही येणार आहे. असं असतानाही कोरोना काळात आपल्या जीवाला धोका पत्करुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठीच आपण प्रशासनाकडे आग्रही असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
बेस्ट कामगार आणि इतर यांच्या बोनस बाबत विचार होऊल आयुक्तांशी बोलणे सुरू आहे त्याबाबत सकारात्मक निकाल निघेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.








