रूग्ण संख्या कमी होत आहे म्हणजे कोरोना गेला असे नाही याच भान मुंबईकरांना येऊ लागलं आहे. आता आगामी काळ काळजी घेतच कोरोना सोबत जगावं लागेल याची जाणीव ही मुंबईकरांना आली आहे. मुंबई फिनिक्स भरारीच्या तयारीत आहे. या मागील मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्नही दडून राहत नाहीत हेही तेवढंच खरं…
रविवारी मुंबईत शून्य कोरोना मृत्यू नोंद करण्यात आली. अशी आकडेवारी यापुढे सतत येत राहील अशी प्रार्थना सर्वच मुंबईकर करत आहेत. मुंबईत शून्य कोरोना मृत्यू नोंद होणे हे रविवारी दुसऱयांदा घडले, यापूर्वी 26 मार्च 2020 रोजी पहिल्यांदा मुंबईत कोरोना मृत्यू शून्य झाल्याची नोंद करण्यात आली होती असे पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मात्र त्यावेळी दुसऱया लाटेचा प्रकोप नुकताच सुरु झाला होता. त्या तुलनेत मुंबईतील सद्य स्थिती बऱयापैकी नियंत्रणात आहे. त्यामुळेच सवलत देण्यावर विचार होत आहे. ही सवलत मुंबईच्या भरारीला नक्की तारेल अशी आशा आहे. दरम्यान रविवारी शून्य मृत्यू नोंद करण्यात आली त्याच दिवशी राज्य सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी दिवाळी नंतर अधिक सवलत देण्याचा विचार स्थितीजन्य रुग्णसंख्या पाहून घेण्यात येईल असे सूतोवाच केले. हा निर्णय देखील मुंबईच्या भरारीत भर टाकणारा असू शकतो. सध्या दोन डोस लस लाभार्थी लोकल प्रवास करत आहेत. उर्वरित एक डोस घेणारे बसने प्रवास करत आहेत. हा रोजचा प्रवास त्यांना महागडा पडत आहे. तसेच दोन डोसशिवाय प्रवेश निषिद्ध करण्यात आलेल्या वास्तूतदेखील मुंबईकर प्रवेश करू शकत नाहीत. यातून मुंबईसारख्या 24 तास कार्यरत असलेल्या शहराला अडथळे ठरत आहेत. दैनंदिन जीवनात कामानिमित्त प्रवास करणाऱया मुंबईकरांना सध्या अडथळ्य़ांची शर्यत पार करावी लागत आहे. असा सोशिक वर्ग मोठा आहे. त्यासाठी मुंबईत लसीकरण सेंटर वाढवून डोस दिले जात आहेत. मात्र लस तुटवडा आणि अन्य बाबी लसीकरणाचे अडसर ठरत आहेत. या सर्वावर मात करून मुंबईतील जीवनमान नियमात सुरु आहे.
मुंबईतील कोरोना कमी करण्यामागील मुंबई पालिकेचे प्रयत्न दडून राहत नाहीत. पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाचा अक्षरशः पाठलाग केला. मात्र त्याचवेळी पालिकेसमोर काही आव्हानेदेखील होती. ही आव्हाने त्याचवेळी नियोजनबद्ध सोडविली असती तर सवलत देण्याचा दिवस यापूर्वीच आला असता असा सूरदेखील काही मुंबईकरांमध्ये अद्याप आहे. 15 ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना लोकल प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातही दोन डोस नंतर 14 दिवस उलटून जाण्याची अट ठेवण्यात आली होती. 15 ऑगस्टपासून 21 दिवसांनंतर होणाऱया रुग्णसंख्येवर कोरोना टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग लक्ष ठेऊन होती. संसर्ग वाढतो कि कमी होतो यासाठी हे निरीक्षण महत्वाचे होते. शिवाय या सवलतीला लागूनच सण उत्सव सुरु झाले होते. मात्र या प्रसंगाला सामोरे जाताना पालिकेने मोफत 266 चाचणी केंद्रे सुरु केली. यातून रुग्णसंख्येचे निरीक्षण सुरु झाले होते. पालिकेच्या म्हणण्यानुसार मुंबईत आतापर्यंत 1.10 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या काही दिवसात पाचशे रुग्णसंख्या आढळण्याची नोंददेखील होत होती. मात्र गेल्या रविवारपर्यंत तीनशेच्या घरात मुंबईची रुग्णसंख्या आढळून येऊ लागल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. रविवारी 28 हजार 697 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात 367 रुग्ण आढळले होते. तर त्याच दिवशी 518 रुग्ण कोविडमधून बरे झाले होते. आणि त्याच दिवशी मृतांची संख्या शून्य नोंदविण्यात आली. सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के एवढा आहे. हे ही कमी नसून 100 टक्क्यांवर येण्यास थोडाच कालावधी असल्याचे मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 1214 दिवसांवर गेला आहे. रुग्णांची सद्य स्थिती पाहता जास्त लक्षणे असलेले, गंभीर लक्षणे असलेले तसेच मध्य लक्षणे असलेलं आणि दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण असे मिळून मुंबईत 15 हजार 928 एवढे रुग्ण आहेत. तर सक्रिय रुग्णात लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेले आदी मिळून 2 हजार 325 रुग्ण असून बेडची क्षमता 25 हजार 220 एवढी ठेवण्यात आली आहे. तर आयसीयू 2 हजार 217 तर व्हेंटिलेटर 1 हजार 295 बेड्स तसेच ऑक्सिजन बेडची संख्या 7 हजार 998 एवढी आहे. त्याचवेळी 16 ऑक्टोबरपर्यंत सक्रिय कंटेनमेंट झोनदेखील शून्य नोंद झाल्याने वस्त्यांमधील कोरोना काढता पाय घेत असल्याचे दिसून येते. मात्र सक्रिय आढळलेल्या 50 इमारती सीलबंद आहेत. कोरोना विरोधातील ही पालिकेची तयारी असताना दुसऱया बाजूला मुंबईतील कोरोना नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी सुरु ठेवली. आतापर्यंत जीनोम सिक्वेन्सिंगचे तीन टप्पे झाले. रविवारी प्रसिद्ध झालेल्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या तिसऱया टप्प्यातील अहवालात देखील मुंबईसाठी आनंद वार्ता दडली होती. यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र 343 नमुन्यातून 54 टक्के डेल्टा व्हेरिएंट तर 34 टक्के लोकांमध्ये डेल्टापेक्षा कमी तीव्रता असलेला व्हेरिएंट असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी काळजी घेणं आवश्यक असून लसीकरण करून घेण्यावर भर देण्यास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सुचवले. तर कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या 55 नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी 7 जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. शिवाय या 55 पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे अहवालात नमूद आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्या 168 नागरिकांना कोविड संसर्ग झाला. यापैकी निव्वळ 46 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही 7 जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यातही मृत्यू नोंद नसल्याचे अहवालात आहे. नुकताच प्रसिद्ध झालेला हा जीनोम सिक्वेसिंगचा अहवाल आणि रुग्णसंख्या घटत असल्याचा दैनंदिन अहवाल लसीकरणाचे महत्व सांगणारा आहे. सध्या मुंबईच्या नव्या भरारीच्या मागे मोठय़ा संख्येने झालेले लसीकरण हेच दिसून येत आहे. शिवाय मुंबईकरांमध्ये मोठय़ा प्रमाणात हर्ड इम्युनिटी तयार झाल्याचे मतदेखील तज्ञ सांगत आहेत. आजची नव्या रुग्णांची आणि बरे होणाऱया रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसली तरी कोरोनाची दुसरी लाट अद्याप सुरु आहे. शिवाय तिसऱया लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. मुंबईकरांना निर्बंधांमध्ये सवलत देण्याच्या प्रयोगाचे स्वागतच होईल. मात्र त्याचवेळी लसीकरण वेळेत पूर्ण करणे, त्यासाठी लसीकरणाबाबत जागरूकता करणे, लसीकरणाला प्रोत्साहन देताना कमी पडत असलेल्या मुद्यांवर विचार करणे याचा पालिकेने विचार करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्या, मृत्यू, कंटेन्टमेंट झोन, सक्रिय रुग्ण नियंत्रणात येत असताना मुंबईतील कोरोनाला संपवण्याची हीच वेळ योग्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी पालिकेला मुंबईकरांचे सहकार्य अपेक्षित आहे.
राम खांदारे








