ऑनलाईन टीम / मुंबई :
बीएमडब्ल्यू कार चोरीतील आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 2 लाखांची लाच स्विकारताना मुंबई क्राईम ब्रँचच्या मालमत्ता कक्षातील सहाय्यक निरीक्षक नागेश अंबादास पुराणिक याला लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.
पुराणिक यांच्याकडे बीएमडब्ल्यू कार चोरीचे प्रकरण तपासाकरीता होते. या गुह्यात एका महिलेचा पती आणि त्याच्या मित्राचा सहभाग होता. या दोघांवर कारवाई न करण्यासाठी पुराणिक याने महिलेकडे 12 लाखांची लाच मागितली होती. या महिलेने पुराणिक यांना 4 लाख यापूर्वी दिले होते. उर्वरित आठ लाख रुपये देणे महिलेला शक्य नव्हते. मात्र, पुराणिक 8 लाखांसाठी तगादा लावत असल्याने महिलेने लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली. लाचलुचपत विभागाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. त्यावेळी पुराणिक याला दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.