ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यात अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये देखील पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेत गुजरात हायकोर्टाने राज्य सरकारला विकेंड कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील अधिक कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
गुजरात हायकोर्टाने राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन विकेंड कर्फ्यूचा निर्णय राज्य सरकारला घेण्यास सांगितला आहे. मात्र, हायकोर्टाला वाटते की राज्यात लॉकडाऊन लावला पाहिजे.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार मंगळवारी देशात 96,982 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 478 जणांनी कालच्या एका दिवसात आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटी 26 लाख 86 हजार 049 वर पोहोचला आहे. तर आता पर्यंत 1 लाख 65 हजार 547 जणांचा मृत्यू झाला आहे.