मुंबईच्या खराब फॉर्मचा लाभ घेण्यासाठी आरसीबी महत्त्वाकांक्षी
पुणे / प्रतिनिधी
यंदाच्या आयपीएल हंगामात अद्यापही सूर न सापडलेल्या मुंबई इंडियन्स संघाची आज (शनिवार दि. 9) चौथी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाविरुद्ध रंगणार असून मुंबईचा संघ येथे आपल्या पहिल्या विजयाची नोंद करणार का, याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत सायंकाळी 7.30 वाजल्यापासून रंगणार आहे.
आरसीबी संघाने तीन सामन्यांतून 4 गुण मिळवले आहेत. मुंबई इंडियन्स संघाविरोधात विजय मिळवल्यास गुणतालिकेत अव्वलस्थान मिळणार असल्याने त्यांना विजयाची अधिक प्रतीक्षा आहे.
रोहित शर्मा आणि 15 करोड रुपयात विकत घेतलेला इशान किशन यांच्या खराब फॉर्मची चिंता मुंबईच्या संघाला आहे. पहिल्या लढतीचा अपवाद वगळला तर किशनला म्हणावा तसा सूर गवसला नाही. रोहित शर्मालाही अजून लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबईला धावा करण्यात अडचण येत आहे. या दोन सलामीवीरांकडून चांगली सलामी मिळत नसल्याने मधल्या फळीवर दबाव येत आहे.

यानंतर डेव्हॅल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केरॉन पोलार्ड अशी फलंदाजी लाईनअप आहे. सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म परत मिळवला आहे. पोलार्डनेही मागच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करून मुंबईच्या संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली होती. जसप्रित बुमराह, थंपीवर फास्ट बॉलिंगची मदार आहे. अश्विन, मॉर्गन, मयंक मार्कंडे यांच्यावर फिरकीची मदार असेल.
आयपीएलमध्ये रनरेट हा सर्वात महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा स्पर्धेच्या अखेरच्या क्षणी समान गुण असतात, तेव्हा रनरेट निर्णायक ठरत असतो. पण, मोठय़ा पराभवांमुळे मुंबईचा रनरेट जास्तच खालावला आहे. आरसीबीविरुद्ध सामन्यात मुंबईने विजय मिळवला नाही, तर त्यांच्यासाठी बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकतो. त्यामुळे आता मुंबईला विजय हा अनिवार्य असेल. अन्यथा त्यांच्यावर गुणतालिकेत तळाला जाण्याची पाळी येऊ शकते.
आरसीबी संघाची फॅफ डय़ू प्लेसिस, विराट कोहली, अनुज रावत, रुदरफोर्ड यांच्यावर फलंदाजी अवलंबून आहे. विराट कोहलीचा फॉर्म हा आरसीबीसाठी चिंतेचा विषय आहे. आरसीबी संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आपल्या विवाह सोहळय़ानंतर पुन्हा एकदा संघात परतत असून असून यामुळे हा संघ आणखीन मजबूत झाली आहे. दिनेश कार्तिक आरसीबीसाठी उत्तम फिनिशरची भूमिका बजावताना दिसून येत आहे. मोहम्मद सिराज, डेविड विली, हर्षल पटेल हे फास्ट बॉलिंगची बाजू सांभाळतील. वणिंदू हसरंगा फिरकीची बाजू सांभाळेल.
प्रतिस्पर्धी संघ
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, ऋतिक शोकिन, जसप्रित बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनिएल सॅम्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, केरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.









