राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी नमवले, सुर्यकुमार यादवचे तडफदार अर्धशतक, बुमराहचे 20 धावात 4 बळी
वृत्तसंस्था/ अबु धाबी
सुर्यकुमार यादवचे तडफदार आक्रमक अर्धशतक आणि जसप्रित बुमराहच्या 20 चेंडूतील 4 धावांच्या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी धूळ चारली व स्पर्धेच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली. मुंबईने 4 बाद 193 धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव 18.1 षटकात सर्वबाद 136 धावांवरच गुंडाळला गेला.
विजयासाठी 194 धावांचे आव्हान असताना राजस्थान रॉयल्सची प्रारंभीच 3 बाद 12 अशी दाणादाण उडाली आणि नंतर ते क्वचितच या पडझडीतून सावरु शकले. बोल्टने यशस्वी जैस्वाल व संजू सॅमसन यांना बाद केले तर बुमराहने स्टीव्ह स्मिथचा मोठा अडसर दूर केला. बटलरने 44 चेंडूत 70 धावांची भागीदारी साकारली असली तरी त्याला दुसऱया बाजूने किंचीतही साथ लाभली नाही.
संजू सॅमसन (0), महिपाल लोमरोर (11), टॉम करण (15), तेवातिया (5) स्वस्तात बाद झाले आणि या सलग पडझडीनंतर राजस्थानचा पराभव ही निव्वळ औपचारिकता होती.
सुर्यकुमारची फटकेबाजी

सुर्यकुमार यादव (47 चेंडूत नाबाद 79), हार्दिक पंडय़ा (19 चेंडूत नाबाद 30), रोहित शर्मा (35), डी कॉक (23) यांच्या फटकेबाजीनंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी राजस्थान रॉयल्सविरुद्ध 4 बाद 193 धावांची मजल मारली. श्रेयस गोपालने एकाच षटकात रोहित व इशान यांना बाद करत खळबळ उडवून दिली होती. पण, अंतिम टप्प्यात सुर्यकुमार व हार्दिक पंडय़ाची फलंदाजी उत्तम बहरल्यानंतर मुंबईला सन्मानजनक धावसंख्या सहज पार करता आली.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिले. त्यांचा हा निर्णय पहिल्या टप्प्यात सार्थ ठरु शकणार का, याबद्दल साशंकता होती. पण, अंतिमतः त्यांची रणनीती उत्तम फळल्याचे स्पष्ट झाले. क्विन्टॉन डी कॉक व रोहित शर्मा यांनी 4.5 षटकात 49 धावांची सलामी दिली.
क्विन्टॉन डी कॉकने 15 चेंडूत 3 चौकार व एका षटकारासह जलद 23 धावा फटकावल्या तर कर्णधार-तडाखेबंद सलामीवीर रोहित शर्माने नेहमीच्या शैलीत गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. पण, यापैकी एकालाही आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही. प्रारंभी, डी कॉक मुंबईच्या डावातील बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे बटलरकडे सोपा झेल दिला.
डावातील 10 व्या षटकात रोहित शर्मा बाद झाला, तेथे मुंबईला मोठा धक्का बसला. श्रेयस गोपालच्या चेंडूवर पुढे सरसावून उत्तूंग फटका मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर लाँगऑनवरील तेवातियाने सोपा झेल पूर्ण केला. त्यानंतर इशान किशनने आल्या पावलीच साहसी फटका खेळण्याची चूक केली आणि याची मोठी किंमत त्याला आपली विकेट गमावण्याच्या रुपाने मोजावी लागली.
गोपालच्या लेगब्रकवर एक्स्ट्रा कव्हरवरील सॅमसनने इशानचा झेल टिपला. 14 व्या षटकात कृणाल पंडय़ाला आर्चरने बाद केले. मिडविकेटवरील गोपालने झेल पूर्ण केल्यानंतर कृणालची निराशा झाली.
सुर्यकुमार यादवने मात्र एक बाजू लावून धरत जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने अर्धशतक तर साजरे केलेच. त्या शिवाय, मुंबईला सुस्थितीत आणण्यात सर्वात मोलाचे योगदान उचलले. सुर्यकुमारने चौफेर फटकेबाजी करत राजस्थानच्या जवळपास हरएक गोलंदाजावर उत्तम दडपण राखले होते.
गोलंदाजीच्या आघाडीवर राजस्थानतर्फे श्रेयस गोपालने 4 षटकात 28 धावांमध्ये 2 बळी घेतले. याशिवाय, कार्तिक त्यागी, जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.
दहाव्या षटकात श्रेयस गोपालचे दुहेरी बळी
राजस्थानचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपालचे डावातील दहावे षटक मुंबई इंडियन्सच्या गोटात अक्षरशः खळबळ माजवणारे ठरले. गोपालने या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन बळी घेत एकच धमाका केला. प्रारंभी, पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा तर दुसऱया चेंडूवर इशान किशनला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. दोन्ही बिनीचे मोहरे लागोपाठ बाद झाल्यानंतर याचा मुंबईच्या धावगतीवर देखील विपरित परिणाम दिसून आला.
धावफलक
मुंबई इंडियन्स : क्विन्टॉन डी कॉक झे. बटलर, गो. कार्तिक त्यागी 23 (15 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रोहित शर्मा झे. तेवातिया, गो. गोपाल 35 (23 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), सुर्यकुमार यादव नाबाद 79 (47 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार), इशान किशन झे. सॅमसन, गो. गोपाल 0 (1 चेंडू), कृणाल पंडय़ा झे. गोपाल, गो. आर्चर 12 (17 चेंडूत 1 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 30 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 14. एकूण 20 षटकात 4 बाद 193.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-49 (डी कॉक, 4.5), 2-88 (रोहित, 9.1), 3-88 (इशान, 9.2), 4-117 (कृणाल, 13.6).
गोलंदाजी : अंकित रजपूत 3-0-42-0, श्रेयस गोपाल 4-0-28-2, जोफ्रा आर्चर 4-0-34-1, कार्तिक त्यागी 4-0-36-1, टॉम करण 3-0-33-0, राहुल तेवातिया 2-0-13-0.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल झे. डी कॉक, गो. बोल्ट 0 (2 चेंडू), जोस बटलर झे. पोलार्ड, गो. पॅटिन्सन 70 (44 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. डी कॉक, गो. बुमराह 6 (7 चेंडूत 1 चौकार), संजू सॅमसन झे. शर्मा, गो. बोल्ट 0 (3 चेंडू), महिपाल लोमरोर झे. बदली खेळाडू (अनुकूल रॉय), गो. चहर 11 (13 चेंडूत 1 चौकार), टॉम करण झे. हार्दिक पंडय़ा, गो. पोलार्ड 15 (16 चेंडूत 1 चौकार), राहुल तेवातिया त्रि. गो. बुमराह 5 (6 चेंडूत 1 चौकार), जोफ्रा आर्चर झे. पोलार्ड, गो. बुमराह 24 (11 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), श्रेयस गोपाल झे. डी कॉक, गो. बुमराह 1 (2 चेंडू), अंकित रजपूत झे. शर्मा, गो. पॅटिन्सन 2 (5 चेंडू), कार्तिक त्यागी नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 2. एकूण 18.1 षटकात सर्वबाद 136.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-0 (जैस्वाल, 0.2), 2-7 (स्मिथ, 1.4), 3-12 (सॅमसन, 2.5), 4-42 (लोमरोर, 8.1), 5-98 (बटलर, 13.3), 6-108 (टॉम करण, 14.4), 7-113 (तेवातिया, 15.2), 8-115 (श्रेयस, 15.5), 9-136 (आर्चर, 17.6), 10-136 (अंकित, 18.1).
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट 4-0-26-2, जसप्रित बुमराह 4-0-20-4, जेम्स पॅटिन्सन 3.1-0-19-2, राहुल चहर 3-0-24-1, कृणाल पंडय़ा 2-0-22-0, केरॉन पोलार्ड 2-0-24-1.









