दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा, सुर्यकुमार, इशानची अर्धशतके तर हार्दिक पंडय़ा 14 चेंडूत 37
वृत्तसंस्था/ दुबई
सुर्यकुमार यादवचे (38 चेंडूत 51) तडफदार अर्धशतक, हाणामारीच्या षटकातील हार्दिक पंडय़ाची 14 चेंडूतील नाबाद 37 व इशान किशनची 30 चेंडूतील नाबाद 55 धावांची आतषबाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा, यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. प्रारंभी, मुंबईने 20 षटकात 5 बाद 200 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर दिल्लीला 8 बाद 143 धावांवर समाधान मानावे लागले.
मुंबईच्या डावात एकीकडे, सुर्यकुमार यादवने 38 चेंडूत 51 धावांची आतषबाजी केली तर दुसरीकडे, हार्दिक पंडय़ाने 5 उत्तूंग षटकारांसह दिल्लीच्या गेमप्लॅनला मोठा सुरुंग लावला.
प्रारंभी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि अश्विनने डावातील दुसऱयाच षटकात रोहित शर्मासारखा मोहरा गारद केल्यानंतर दिल्लीसाठी ही स्वप्नवत सुरुवात ठरली. अर्थात, डी कॉकने आक्रमक पवित्र्यावर भर देत दिल्लीच्या गोलंदाजांची बरीच धुलाई केली आणि यामुळे मुंबई इंडियन्सला पहिल्या काही षटकात अगदी 10 ची सरासरी राखता आली.
डी कॉकने 25 चेंडूत जलद 40 धावा फटकावल्या. त्याच्या या आक्रमक खेळीत 5 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. डावातील 8 व्या षटकात पुन्हा एकदा अश्विनच दिल्लीचा तारणहार ठरला आणि त्याने डी कॉकचा अडथळा दूर सारला. डी कॉक इनसाईड आऊटचा फटका खेळणार, हे लक्षात घेत अश्विनने चेंडूचा वेग आणखी कमी केला आणि याच चक्रव्युहात डी कॉक अलगदपणे अडकला. लाँगऑफवरील धवनने सोपा झेल टिपत डी कॉकची खेळी संपुष्टात आणली. तो बाद झाला, त्यावेळी मुंबईने 7.4 षटकात 78 धावांपर्यंत मजल मारली होती.
सुर्यकुमार यादवने आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी साकारताना 38 चेंडूत 51 धावा झोडपल्या. पण, मोक्याच्या क्षणीच त्याने नोर्त्जेच्या गोलंदाजीवर डॅनिएल सॅम्सकडे झेल दिला. तो बाद झाला, त्यावेळी मुंबईची 11.5 षटकात 3 बाद 100 अशी स्थिती होती.
केरॉन पोलार्डने रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर आल्या पावली दुसऱयाच चेंडूवर उत्तूंग षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्याच्यावरच उलटल्याचे स्पष्ट झाले. पोलार्ड बाद झाला, त्यावेळी मुंबईचा संघ 12.2 षटकात 4 बाद 101 अशा स्थितीत होता.
कृणाल पंडय़ा बाद झाल्यानंतर एका बाजूने इशान किशन फटकेबाजी करत असताना त्याच्या साथीला हार्दिक पंडय़ा क्रीझवर उतरला आणि अवघ्या 14 चेंडूतच 37 धावांची आतषबाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा सर करुन दिला.
इशान किशन व हार्दिक पंडय़ा यांनी सहाव्या गडय़ासाठी 3.5 षटकातच 60 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
दिल्ली कॅपिटल्सतर्फे अनुभवी अश्विनने 29 धावात 3 बळी घेतले असले तरी त्यांच्या अन्य गोलंदाजांची बरीच धुलाई झाली. नोर्त्जेला 4 षटकात एका बळीसाठी 50 धावा मोजाव्या लागल्या. तर आफ्रिकन जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाला 4 षटकात 42 धावा मोजाव्या लागताना एकही फलंदाज बाद करता आला नाही. नवा चेंडू हाताळण्याची संधी मिळालेला डॅनिएल सॅम्सही (4 षटकात 0-44) महागडाच ठरला.
हार्दिक पंडय़ा क्रीझवर उतरला आणि सारेच चित्रच पालटून टाकले!

ठरावीक अंतराने गडी बाद होत असताना मुंबईने षटकामागे 10 ची सरासरी राखण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मधल्या काही षटकात धावगती मंदावली आणि मुंबई आव्हानात्मक धावसंख्या उभी करु शकणार का, याबद्दलही साशंकतेचे चित्र निर्माण झाले. पण, याचवेळी अष्टपैलू हार्दिक पंडय़ा क्रीझवर उतरला आणि त्याने 5 गगनचुंबी षटकारांसह 14 चेंडूत नाबाद 37 धावांची आतषबाजी करत सारे चित्रच पालटून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला इशान किशनकडूनही उत्तम साथ मिळाली.
दिल्लीचे पहिले तिन्ही फलंदाज शून्यावर बाद अन्…
विजयासाठी 201 धावांचे आव्हान असताना दिल्ली कॅपिटल्सचे पहिले तीनही फलंदाज शून्यावरच बाद झाले आणि 3 बाद 0 अशी दाणादाण उडाल्यानंतर त्यांच्या आव्हानातील जानच निघून गेली. पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे यांना बोल्टने बाद केले तर शिखर धवनला बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. मधल्या फळीतील स्टोईनिसने 46 चेंडूत 65 धावा केल्या. पण, प्रारंभी झालेल्या नाटय़मय पडझडीमुळे दिल्ली कॅपिटल्सला त्यातून सावरणे अर्थातच कठीण होते.
धावफलक
मुंबई इंडियन्स : क्विन्टॉन डी कॉक झे. धवन, गो. अश्विन 40 (25 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), रोहित शर्मा पायचीत गो. अश्विन 0 (1 चेंडू), सुर्यकुमार यादव झे. सॅम्स, गो. नोर्त्जे 51 (38 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), इशान किशन नाबाद 55 (30 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), पोलार्ड झे. रबाडा, गो. अश्विन 0 (2 चेंडू), कृणाल झे. सॅम्स, गो. स्टोईनिस 13 (10 चेंडूत 1 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 37 (14 चेंडूत 5 षटकार). अवांतर 4. 20 षटकात 5 बाद 200.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-16 (रोहित, 1.3), 2-78 (डी कॉक, 7.4), 3-100 (सुर्यकुमार, 11.5), 4-101 (पोलार्ड, 12.2), 5-140 (कृणाल, 16.1).
गोलंदाजी : सॅम्स 4-0-44-0, अश्विन 4-0-29-3, रबाडा 4-0-42-0, अक्षर 3-0-27-0, नोर्त्जे 4-0-50-1, स्टोईनिस 1-0-5-1.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. डी कॉक, गो. बोल्ट 0 (2 चेंडू), शिखर धवन त्रि. गो. बुमराह 0 (2), अजिंक्य रहाणे पायचीत गो. बोल्ट 0 (3 चेंडू), श्रेयस अय्यर झे. शर्मा, गो. बुमराह 12 (8 चेंडूत 3 चौकार), स्टोईनिस त्रि. गो. बुमराह 65 (46 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), ऋषभ पंत झे. यादव, गो. कृणाल 3 (9 चेंडू), अक्षर पटेल झे. चहर, गो. पोलार्ड 42 (33 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), सॅम्स झे. डी कॉक, गो. बुमराह 0 (2 चेंडू), कॅगिसो रबाडा नाबाद 15 (15 चेंडूत 2 चौकार), नोर्त्जे नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 8 बाद 143.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-0 (शॉ, 0.2), 2-0 (रहाणे, 0.5), 3-0 (धवन, 1.2), 4-20 (श्रेयस, 3.5), 5-41 (पंत, 7.5), 6-112 (स्टोईनिस, 15.1), 7-112 (सॅम्स, 15.3), 8-141 (अक्षर, 19.5).
गोलंदाजी : बोल्ट 2-1-9-2, बुमराह 4-1-14-4, कृणाल पंडय़ा 4-0-22-1, कोल्टर नाईल 4-0-27-0, पोलार्ड 4-0-36-1, राहुल चहर 2-0-35-0.









