शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथे आली होती : भावांचाही स्वॅब घेतला
प्रतिनिधी/ सांगली
मुंबईहून आपल्या मुळगावी शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथे आलेल्या एका 23 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना रूग्णांची संख्या आता एकने वाढली असून जिल्हय़ात एकूण 28 रूग्ण झाले आहेत. यातील एक रूग्ण मयत असून उर्वरित 26 रूग्ण बरे झाले आहेत. या महिलेला दोन दिवसापुर्वी त्रास होत असल्याने तिला व तिच्या भावाला इस्लामपूर येथे संस्था क्वारंटाईन केले होते. त्याठिकाणाहून तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी आला असून ती पॉझिटीव्ह निघाली आहे तर तिच्या भावाचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
ही महिला मुंबईत राहते. पण 16 एप्रिल रोजी ती मुंबईतून आपल्या गावी आली होती. त्यानंतर ती निगडी खुर्द येथे राहिली होती. पण दोन दिवसापुर्वी तिला त्रास होत असल्याचे सांगितल्यावर तिला इस्लामपूर येथील संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. गुरूवारी तिचा स्वॅबही घेण्यात आला होता, तिचा स्वॅब पॉझिटीव्ह आल्यावर तिला तातडीने मिरजेच्या कोरोना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून तिच्यावर आता उपचारही सुरू करण्यात आले आहेत. तिच्या भावाचाही स्वॅब गुरूवारी घेण्यात आला होता. पण त्या स्वॅबचा अहवाल व्यवस्थित न आल्याने त्याचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला असून त्याचा अहवाल आता शनिवारी येणार आहे. दरम्यान या महिलेच्या कुंटुंबांतील सदस्य आणि तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
निगडी खुर्द गाव सिल
शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. यामुळे निगडी खुर्द गाव सील करण्यात आले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासना कडून बैठका सूचना व प्रतिबंधात्मक उपाय योजना करिता प्रशासन राबविण्यात आलेले आहे. शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील एक महिला व तिचा भाऊ मुंबई येथून दिनांक 16 रोजी आले आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते गेले अनेक वर्षापासून मुंबई स्थित आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने ते त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्द येथे आले. मुंबईवरून मूळगावी आले असताना त्यांच्या आरोग्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. अगदी सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे ते गावात राहिले होते.परंतु चार दिवसापूर्वी मुंबईहून आलेल्या महिलेला ताप येऊन त्या आजारी पडल्या. दरम्यान प्रशासनाकडून निगडी खुर्द गांवा संदर्भात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल मिळाल्यानंतर शिराळा महसूल प्रशासनाकडून गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. तसेच शिराळा आरोग्य विभागाकडून या महिलेशी संपर्क आलेल्या लोकांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईवरून परत आल्यानंतर ती महिला कोणत्या ठिकाणी व कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आली असल्याचे बारकावे पडताळून पाहण्याच्या कामी सध्या शिराळा प्रशासनाने गतिमान हालचाली सुरू केलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात शिराळा तालुक्यात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने निगडी खुर्द गावासह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.








