- मुंबईकरांनों, आज विनाकारण बाहेर पडू नका!
ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या 44 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये काल 12 तासांत सर्वाधिक 214.44 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला असून 12 ते 13 जूनला म्हणजेच उद्या आणि परवा रेड अलर्ट देण्यात आला असला तरी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यासोबतच काम नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे.
- मुंबईतील लोकल सेवा आज सुरळीत सुरू
दरम्यान, पहिलाच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. पावसाने सुरुवातच अतिरौद्ररुप धारण करून केल्याने मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले, तसेच अनेक ठिकाणी वाहतूक, लोकल सेवा देखील विस्कळीत झाली होती. तसेच आता पुढील आणखी चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मात्र, आज सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली असून आज लोकल सेवा सुरळीतपणे सुरु झाली आहे. त्यामुळे आज लसीकरण केंद्रावर लसीकरण देखील सुरू रहाणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडचा आढावा घेतला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्यासंदर्भात आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.








