ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई शहरासह उपनरांतही काल संध्याकाळ पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. या बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच येत्या 24 तासांतही मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचे रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.
- लोकल सेवा ठप्प

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवर होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कारण मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. सायन रेल्वे स्थानकांतील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. अशाच प्रकारे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर देखील पाणी भरले आहे.
प्रचंड पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.
मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं असल्यामुळे बेस्ट बसची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरात 122.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांना सुट्टी

मुंबई, ठाणे परिसरात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.









