ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईसह उपनगरात पावसाने काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

तसेच मुंबईसह उपनगरात आज (4 ऑगस्ट) आणि उद्याही (5 ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवणे तसेच समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत. पावसाचा परिणाम लोकलवर ही झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.









