ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत दोन संशयित कोरोना व्हायरस रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱयाने ही माहिती दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या, चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदेक झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळीतील कस्तुरबा हॉस्पटिलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथेच त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत.
त्या म्हणाल्या, चीन मधून मुंबईत आलेल्या या दोन संशयित रुग्णाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, या व्हायरसची लागण झाल्यानंतर खोकला येणे, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळतात.